करोनात आई-वडील गमावलेल्यांना मोफत शिक्षण

करोनात आई-वडील गमावलेल्यांना मोफत शिक्षण

शंकर एज्युकेशन सोसायटीचा निर्णय

देवळाली कॅम्प । Deolali Camp

करोना महामारीत देवळाली कॅम्प परिसरात आई-वडील गमावलेल्या मुलांना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील शंकर एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. गुजर सुभाष हायस्कूलमध्ये मोफत दिले जाणार असल्याची घोषणा सोसाईटीचे चेअरमन नवीन गुरुनांनी व सचिव रतन चावला यांनी दिली.

गेल्या पंधरा महिन्यापासून करोनामुळे शिक्षणक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात खाजगी शाळांची अवस्था अतिशय वाईट असून ऑनलाइन शिक्षण असल्याने पालकांकडून फी भरण्याबाबत प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतन कसे देणार हा प्रश्न संस्थाचालकांपुढे उभा राहिला आहे.

सद्यस्थितीत खाजगी शाळेत केवळ 20 ते 30 टक्के फी जमा होत असून 70 टक्के फी कशी व कोठून आणणार हा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्त कार्यक्रम आयोजित करून खाजगी शाळांच्या फी संदर्भात निर्णय घेणे गरजेचे बनले आहे.

दरम्यान अशा प्रतिकूल परिस्थितीतही देवळाली परिसरात करोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या पाल्यांना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शंकर एजुकेशन सोसायटीने घेतला आहे.

सद्यस्थितीत देशात 3 कोटी विद्यार्थी खाजगी शाळेतून शिक्षण घेत आहेत. महामारीमुळे पालकांचे छत्र हरपलेल्या पाल्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी संस्थेने हा निर्णय घेतला आहे.

सध्या शिक्षण व आरोग्य हे विभाग अतिशय महत्त्वाचे बनले आहेत. ज्याप्रमाणे केंद्र सरकार संरक्षण विभागासाठी स्वतंत्र तरतूद करते त्याच धर्तीवर शिक्षण व आरोग्य विभागासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी व भावी पिढीला जीवदान द्यावे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com