सोसायटीत ७५ लाखांचा अपहार
नाशिक

सोसायटीत ७५ लाखांचा अपहार

कर्जदारांकडून घेतलेले पैसे लिपिकाने संस्थेत भरलेच नाहीत

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर | प्रतिनिधी

तालुक्यातील आगासखिंड येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या लिपिकाने जवळपास 100 कर्जदारांकडून घेतलेल्या रकमा संबधीतांच्या खात्यावर जमा न करता स्वत:च ठेवून घेत संस्थेत 75 लाखांचा अपहार केला असल्याची बाब लेखा परिक्षणातून उघड झाली आहे.

1 एप्रिल 2012 पासून संस्थेच्या कर्जदार सभासदांनी आपल्या कर्जाची फेड करण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात जाऊन लिपिकाकडे पैसे जमा केले. मात्र, त्या लिपिकाने या रकमा कर्ज खात्यात जमा न करता, त्या स्वत:कडेच ठेवल्या. लिपिकाने अनेक कर्जदारांकडून घेतलेल्या रकमेनंतर त्याची पावतीही संबधीतांना दिली नाही तर काही कर्जदारांना पावती दिली. मात्र, ते पावती बूकच हिशोबात दाखवलले नाही.

पैसे घेतल्यानंतर कर्ज खतावणीत जमा रकमेची नोंद करुन येणेबाकी परस्पर कमी करुन टाकली. मात्र, संस्थेत ही रक्कम जमाच केली नाही. अपहार लक्षात आल्यानंतर संस्थेच्या सचिवाने लिपिकाला 16 जानेवारी 2016 रोजी पत्र पाठवून हातावर असलेली रक्कम भरणा करण्याबाबत कळविले. त्यानंतर दोनदा स्मरणपत्र दिल्यानंतर जवळपास 6 महिण्याने लिपिकाने रोज किर्दीप्रमाणे असणारी सर्व रक्कम आपल्या ताब्यात असल्याचे मान्य केले.

संस्थेचा ताळेबंद व सभासद कर्ज खतावणीतील कर्जबाकी, बँक कर्जबाकी जूळत नाही. तो जूळवणे व फरकाची रक्कम संस्थेस भरुन देण्याची जबाबदारी माझी स्वत:ची असल्याचे लिपिकाने 100 रुपयांच्या मुद्रांकावर लिहून दिले. या अपहाराबाबत सचिव जबाबदार नसून संस्थेचे दप्तरी कामकाज व सर्व आर्थिक व्यवहार हे पूर्ण करुन देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यात त्याने म्हटले आहे.

संचालक मंडळाने 23 मार्च 2017 राजी बैठक घेऊन चर्चा केली. तेव्हा ताळेबंदानूसार मेंबर येणे कर्ज व बँकेचे देणे कर्ज यात मोठ्या प्रमाणात तफावत वाढली असल्याचे त्यांना दिसून आले. सभासदांची येणे बाकी कर्जाची रक्कम व सभासदांकडील प्रत्यक्ष कर्ज खतावणीमधील येणे र्नकम जूळत नाही. त्याची खातरजमा करण्यासाठी कर्ज खतावणीमधील कर्जाच्या पोस्टींगची पडताळणी केली असता. अनेक सभासदांचे कर्जाचे पोस्टींग संस्थेच्या रोज किर्दीवर न करता थेट सभासदांच्या कर्ज खतावणीत केल्याचे व सभासदांची येणे बाकी रक्कम परस्पर कमी करुन त्या सभासदांना नव्याने कर्ज वाटप केल्याचेही दिसून आले.

संस्थेच्या रोज किर्दीला व्यवहार न करता मेंबर कर्ज खतावणीमध्ये नोंदी करुन सदरचे रक्कम लिपिकाने स्वत:च्या स्वार्थासाठी वापरल्याचे संचालक मंडळाला दिसून आले. त्याबाबत विचारणा केली असता लिपिकाने ही सर्व रक्कम भरण्यास तयार असल्याचे सांगत या रकमेस संचालक मंडळ अथवा सचिव जबाबदार नाहीत असेही 100 रुपयांच्या मुद्रांकावर स्वत:च्या हस्ताक्षरात हमीपत्र लिहून दिले व हमीपत्रासोबत साडे सात लाख रुपयांचा युनियन बँक ऑफ इंडियाचा भगूर शाखेचा धनादेश व त्याच शाखेचा एक कोरा धनादेश सही करुन संचालक मंडळाकडे दिला.

लिपिकाने नेमकी किती रक्कम वसूल केली ते निश्चित व्हावे यासाठी शासकीय लेखा परिक्षकांमार्फत लेखा परिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लेखा परिक्षणात सभासदांकडून 71 लाख 68 हजार 606 रुपये जमा करुन या भरणा रकमेचा लिपिकाने अपहार केल्याचे उघड झाले. त्याशिवाय लिपिकाने 5 कर्जदार सभासदांना पैसे भरल्याच्या पावत्या दिल्या असून पावत्यांवर लिपिकाची सही आहे. मात्र, सदर रकमा संस्थेच्या वसूली व रोज किर्दीत जमा नाहीत. तसेच सदर पावती बूक लेखा परिक्षणासाठी उपलब्ध झाले नाही. त्यामूळे या पावत्यांच्या 3 लाख 54 हजार 625 रुपयांचाही लिपिकाने अपहार केला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

या अपहारात सचिवाचा सहभाग नसला तरी लिपिकाने केलेल्या कामकाजाची वेळोवेळी तपासणी करणे व त्याच्यावर नियंत्रण ठेवणे यात सचिव अपयशी ठरले असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामूळेच लिपिकाला गैरव्यवहार करणे शक्य झाले आहे. संस्थेच्या आर्थिक नुकसानीस लिपिकाबरोबरच सचिवालाही जबाबदार धरुन दोघांच्याही विरोधात भारतीय दंड विधानातील तरतूदीनूसार योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशीही शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com