द्राक्ष पंढरीतून व्यापारी पसार; शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा

द्राक्ष पंढरीतून व्यापारी पसार; शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादकांना १७ लाखांहून अधिक रकमेस फसविण्यात आले. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात सहा व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

डोरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यातून परदेशात द्राक्ष निर्यातीचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यामुळे परराज्यातील व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादकांना फसविण्याच्या घटना कायम घडत असतात.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द तक्रार दाखल केली. या प्रकरणात पुणे येथील पाडवा ग्री सोल्युशन्स कंपनीचे भागीदार अमित देशमुख (रा. मध्यप्रदेश), भूषण पवार (रा. देवपूर), विशाल विभुते (रा. धुळे), अमोल चव्हाण (रा. कोथरूड), सागर जगताप (रा. बारामती), संतोष बोराडे (रा. निफाड) अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत.

सुनील शिंदे यांच्या द्राक्षबागेची पाहणी करून त्यांच्या शेतातील ११ हजार २८६ किलो माल खरेदी करून पाच लाख २६ हजार १७१ रुपयांचा व्यवहार व्यापाऱ्याने ठरविला.

परंतु, व्यवहाराचे रोख पैसे न देता धनादेश देत शिंदे यांची बोळवण करण्यात आली. धनादेश न वटल्याने व्यापाऱ्याने दुसरा धनादेश दिला. तोही न वटल्याने फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले.

दुसऱ्या घटनेत निगडोळ येथील अनिल मालसाने यांच्या शेतातील ८ हजार ७०१ किलो द्राक्षांच्या व्यवहारात ४ लाख आठ हजार ५०५ रुपये देणे ठरले. हे पैसे मालसाने यांनी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीवर संपर्क साधत मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत गेली.

तिसऱ्या घटनेत नळवाडी येथील संजय वाघ यांच्या शेतातील ९ हजार २६७ किलो द्राक्ष संशयिताने खरेदी करुन व्यवहार ५ लाख ९८ हजार ८५५ रुपयांमध्ये ठरवला. द्राक्ष खरेदी करताना संशयितांनी वाघ यांना चार लाख रुपये आरटीजीएसने दिले. उर्वरीत एक लाख ९८ हजार ८५५ रुपये मिळविण्यासाठी वाघ यांनी संशयितांशी प्रत्यक्ष संर्पक साधला. परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

चौथ्या घटनेत शरद मालसाने यांनी संशयितांना ६ हजार ६८५ किलो द्राक्षे विकली. खरेदी करतांना संशयितांनी मालसाने यांना २५ हजार रुपये दिले. मात्र व्यवहारातील उर्वरीत तीन लाख, ७६ हजार ९० रुपये मागितले असता धनादेश दिला. तो वटला नाही.

पाचव्या घटनेत वलखेड येथील रघुनाथ पाटील यांच्या शेतातील सहा हजार ५०३ किलो द्राक्ष माल संशयितांनी खरेदी केला. यासाठी २ लाख ८२ हजार ३६५ रुपयांचा व्यवहार ठरला. मात्र संशयितांनी पाच महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी अद्याप हे पैसे दिले नाही.

Related Stories

No stories found.