कर्नाटकच्या दोघांकडून कोट्यावधींची फसवणूक

कर्नाटकच्या दोघांकडून कोट्यावधींची फसवणूक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नवीन नाशिक भागात राहणार्‍या एका व्यक्तीची विविध प्रकारे आमिषे देऊन तब्बल चार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात कर्नाटक येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत युवराज रुस्तम गायकवाड ऊर्फ युवराज पाटील (40, रा. प्रताप विहार, पवननगर, नवीन नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित आरोपी महंमद हबीब मोहंमद हनिफ (रा. गुलबर्गा, कर्नाटक) व मोहंमद अब्बास मोहंमद युसूफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनी संगनमत करून फिर्यादी युवराज गायकवाड व त्यांच्या मित्रांशी संपर्क साधला. त्यांना गुंतवणूक केल्यास वेगवेगळे अ‍ॅवॉर्ड, रिवॉर्ड, लक्झरी कार, विदेश यात्रा व जादा मोबदल्याचे आमिष दाखवून 4 कोटी 19 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दोघा भामट्यांनी 19 जानेवारी 2021 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शरणपूर रोडवरील एमराल्ड पार्क या हॉटेलमध्ये फिर्यादी व त्याच्या मित्रांना बोलावले. त्यावेळी जास्त मोबदल्याचे आमिष दाखवून एम. फॉरेक्स व कॉर्बेट क्रिप्टो कॉईन 55 च्या नावावर फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडून विविध बँक खात्यांमधून व रोख स्वरुपात रक्कम स्वीकारली, मात्र बरेच दिवस होऊनही गुंतवणूक केलेल्या रकमेवर ठरल्याप्रमाणे मोबदला व परतावा न देता फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com