चांदवडमध्ये तोतयेगिरीचा भांडाफोड

जि. प. सेवक असल्याचे भासवून कोट्यवधींची फसवणूक
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

* तीन भामट्यांना चांदवडमध्ये अटक

* समाजकल्याणच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेचे सेवक असल्याचे भासवून तीन वर्षांपासून अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणारे रॅकेट चांदवडमध्ये उघडकीस आले आहे.

स्वप्निल रामचंद्र जाधव यांच्या तक्रारीवरून केशव कुर्‍हाडे, विजय पंडित व विजय खैरनार या तिघांविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली.

या तिघांना चांदवड न्यायालयाने 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडे लाभार्थ्यांंकडून भरून घेतलेले 200 अर्ज तसेच डायरीमध्ये 250 लोकांकडून पैसे घेतल्याच्या नोंदी आढळून आल्याने या रॅकेटमधून जिल्ह्यातील शेकडो लाभार्थ्यांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त या प्रवर्गातील नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या चार चाकी वाहन, तीन चाकी वाहन, संगणक, जमीन खरेदी आदी योजना राबवल्या जातात. या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड करण्याची प्रक्रिया शासनाने ठरवून दिलेली आहे.

मात्र, मागील तीन वर्षांपासून जिल्हाभरात एका टोळीने ते जिल्हा परिषदेचे सेवक असल्याचे भासवण्यासाठी जिल्हा परिषदेचे बनावट ओळखपत्र, शिक्के आणि पावती पुस्तके तयार केली. समाजकल्याण विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांची भेट घेऊन त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत. त्याच्या बदल्यात योजनेच्या रकमेच्या दहा टक्के रक्कम आगाऊ घेत. तसेच कागदपत्र व इतर कामांसाठी पाच हजार रुपये घेत असत.

काही दिवसांपूर्वी या भामट्यांनी चांदवड तालुक्यातील स्वप्निल रामचंद्र जाधव व गणेश गवळी यांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रत्येकी 30 हजार रुपयांची मागणी करतानाच आम्ही रितसर पावती देऊ असे सांगितले. तसेच इतर कामांसाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. यावर संशय आल्याने स्वप्निल जाधव यांनी दोन दिवसांनी त्यांच्या राजू अहिरे आणि वाल्मिक वानखेडे या मित्रांनाही योजनेचा लाभ घेण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले.

त्यावेळी चांदवड पोलिसांना याची माहिती दिली. याशिवाय जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनाही माहिती दिली. ते तिघे भामटे आले असता पोलिसांनी सापळा लावून त्यांना रंगेहात अटक केली. यावेळी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट ओळखपत्र, लाभार्थींकडून भरून घेतलेले दोनशे अर्ज व डायरीमध्ये 250 लोकांची यादी आढळून आली आहे.

पदाधिकारी, अधिकार्‍यांना फोन

या भामट्यांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक जिल्हा परिेषद अध्यक्ष, पदाधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांच्या नावाने सेव्ह केले होते. योजनेचा लाभ मिळत नसल्याने एखादा लाभार्थी तगादा लावत असल्यास ते पदाधिकारी व अधिकारी यांना फोन केल्याचे भासवत.

समोरच्या व्यक्तीकडे मोबाईल देऊन त्याचे त्या कथीत पदाधिकारी वा अधिकार्‍याशी बोलणे घडवून आणत. समोरचा व्यक्ती काहीही कारण सांगून लाभ मिळण्यास उशीर होत असल्याचे सांगत असे. तसेच तुम्हाला लाभ निश्चित मिळेल, असे आश्वासन द्यायचा. यामुळे लाभार्थ्यांचा विश्वास बसत असे.

बनावट ओळखपत्र

लोकांचा विश्वास बसावा म्हणून विजय खैरनार याने तो जिल्हा परिषदेत लिपिक असल्याचा, केशव कुर्‍हाडेने तो शिरसगाव लौकी येथे ग्रामसेवक असल्याची बनावट ओळखपत्र तयार करवून घेतली.

पंचवटीत कार्यालय

या टोळीने पंचवटीत दिंडोरी नाका येथे एक कार्यालय उघडून तेथे दोन महिलांची नेमणूक केली होती. योजनेच्या लाभासाठी समाजकल्याण विभागाकडील अर्ज लाभार्थ्यांकडून भरून घेताना त्यांना जिल्हा परिषदेच्या नावाने रक्कम घेतल्याची बनावट पावतीही दिली जात होती. त्यामुळे या कामात फसवणूक नसल्याचा देखावा त्यांनी उभा केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com