सोने सापडल्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
सोने

सोने सापडल्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

सिन्नर । विलास पाटील Sinnar

सिन्नर बसस्थानकाच्या (Sinnar bus stop) आवारातून एकट्या जाणार्‍या महिलेस सोने (gold) सापडण्याचा बहाणा करीत तिघांनी फसवल्याचा व तिच्या गळ्यातील 18 ग्रॅम सोन्याचा हार (Gold necklace) काढून घेतल्याची घटना रविवारी (दि.2) घडली.

बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्र्‍यात (CCTV Camera) ही घटना टिपली असल्याची शक्यता असतानाही पोलिसांकडून (police) त्यासाठी कुठलीही पावले उचलली जात नसून प्रलोभनाला बळी पडली म्हणून सदर महिलेलाच झापत तिची तक्रारही दाखल करण्याची तसदी सिन्नर पोलिसांनी न घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वाजे पेट्रोल पंपाच्या जवळ राहणारी ही महिला नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान आठवडे बाजारात भाजीपाला (Vegetables) खरेदी करण्यासाठी गेली होती.

भाजीपाला खरेदी करून तासाभराने परतताना ही महिला नेहमीच्या सवयीने बस स्थानकाच्या आवारातून जाऊ लागली, त्याचवेळी जवळपास वीसीतला एक तरुण या महिलेला धक्का मारत पुढे गेला व रस्त्यावर पुढे पडलेली वस्तू उचलण्याच्या अविर्भावात निघून गेला. लागला असेल धक्का असे समजून महिला पुढे जाऊ लागताच मागून अजून एक युवक पळत आला व माझे सहा तोळे सोन्याचे दागिने (Gold jewelry) हरवल्याचे या महिलेला थांबून सांगू लागला.

तुम्हाला हे सोने सापडले का? तुम्ही कोणाला उचलताना पाहिले का असे असे म्हणत महिलेवर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, आपण सोने पाहिले नाही असे म्हणत महिला पुढे जाऊ लागताच हा युवक पुढे निघून गेला. त्याचवेळी मागच्या बाजूने दिसायला सभ्य वाटणारा पन्नाशीतला एक गृहस्थ आला. त्याच्या हातातल्या जवळपास सर्व बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या होत्या. गृहस्थ थेट पुढे जाणार्‍या महिलेपर्यंत जात तिला थांबवत, समोरच्या झाडाखाली थांबलेल्या युवकाला सोने सापडले आहे.

आपण त्याच्याकडे जावून काय सापडले ते पाहू असे म्हणत थोडासा बळजबरीने महिलेला ढकलू लागला. सध्या एस.टी.चा संप सुरू असून बसस्थानकात शुकशुकाट असतो. त्याचा फायदा घेत या गृहस्थाने सदर महिला मला सोने बघायचे नाही असे म्हणत असतानाही ढकलत झाडाकडे घेऊन गेला. या गृहस्थाने झाडाजवळ जाताच उभ्या असलेल्या युवकाला ओरडत कोणते सोने सापडले असा प्रश्न विचारला. त्या युवकाने भीत-भीत सोन्याचे दोन तुकडे दाखवले. मला माझ्या नशिबाने सापडले,

तुम्ही कशाला दम देता असा प्रतिप्रश्न या युवकाने करताच, हे सोने ठेवून तू काय करणार, ते आम्हाला विक असे म्हणत या गृहस्थाने हातातल्या एका बोटातली अंगठी (Ring) काढून युवकाला देत सोन्याचा एक तुकडा घेऊन टाकला व मावशी तुम्हीपण गळ्यातली सोन्याची माळ देऊन दुसरा तुकडा घेऊन टाका असे म्हणत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. सदर महिलेने मला सोने नको म्हणत तेथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गृहस्थाने त्यांना भरीस घालत गळ्यातली सोन्याची पोत काढण्यास भाग पाडले.

भुरळ पडल्यागत सदर महिलेने गळ्यातली 18 ग्रॅम सोन्याची पोत दिली आणि सोन्याचा तुकडा घेत ही महिला घरी परतली. जराशा भांबावलेल्या अवस्थेतच सदर महिलेने आपल्या पतीला घडलेली घटना सांगितली व सोन्याचा तुकडा त्यांना दाखवला. हा तुकडा हातात न घेताच तुला फसवलं असं पती म्हणाले आणि दोघेही तातडीने सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) गेले. घडलेली घटना त्यांनी पोलिसांना सांगितली, पोलिसांनी ती लिहून घेतली. दोघा पती-पत्नीना घेऊन पोलिस उपनिरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.

घडलेली घटना व ठिकाण पाहिल्यानंतर बसस्थानक परिसरातील सीसीटीव्हीचा एक कॅमेरा घटना घडली, त्याच भागात असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. त्यानंतर सर्वांनीच बसस्थानकावरील अधिकार्‍यांकडे धाव घेतली. सायंकाळचे सहा वाजून गेल्याने संबंधित सेवक निघून गेले आहेत. उद्या (दि.3) सकाळी दहा-अकरानंतर संबंधित सेवकांकडून सीसीटीव्ही फुटेज मिळेल असे या अधिकार्‍याने सांगितले. त्यावर सकाळी 11 वाजता बसस्थानकावर या असे सांगत जाधव पोलिसांच्या जीपने बसस्थानकाच्या बाहेर पडले. दुसर्‍या दिवशी सदर महिला पतीसह सकाळी 11 पासून दोन-तीन तास बसस्थानकात थांबून होती.

जाधव यांना संपर्क साधूनही ते बसस्थानकात आले नाहीत की पोलिस ठाण्यातून गेल्या पाच-सहा दिवसात सदर महिलेला साधा फोनही आलेला नाही. महिलेच्या पतीने बस स्थानकावरील अधिकार्‍याला भेटत सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. मात्र, पोलिसांशिवाय आम्ही ते तुम्हाला देऊ शकत नसल्याचे त्याने सांगितल्याने त्यांना घरी परत न शिवाय कुठलाही पर्याय राहिला नाही.

बेफिकीर पोलिस यंत्रणा

बस स्थानकाच्या परिसरात घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना सहज शक्य होणार आहे. मात्र, तुम्ही ज्यादा सोन्याच्या प्रलोभनाला बळी पडल्या आणि आता पोलिसांना काय दोष देता असं म्हणत पोलिसांनी महिलेसह तिच्या पतीला झापण्याचे काम केले. घटनेचे गांभीर्य समजून न घेता पोलीस अधिकारी असेच बेफिकीर वागले तर तक्रार तरी कोणाकडे करणार? आठ दिवस पूर्ण होत येऊनही पोलीस ठाण्याकडून साधा फोनही या महिलेला आलेला नाही की तीची तक्रारही नोंदवून घेतल्याबाबत प्रतही दिलेली नाही. पोलिसांचा कारभार असाच सुरू राहिला तर तक्रार करण्यास कुणी पुढे येईल का असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे.

Related Stories

No stories found.