
नाशिक | प्रतिनिधी Nashik
विवाहाच्या संकेतस्थळावरून ओळख करून एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करणारा आरोपी यशवर्धन सुरेश देशमुख पाटील ऊर्फ सुमेश सुरेश पोस्कर (३४, रा. सल्फेवाड, गुहाघर) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे कारावास व एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, यशवर्धन सुरेश देशमुख-पाटील असे नाव सांगणाऱ्या आरोपीने शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून ओळख करून पीडित महिलेला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर त्याने नाशिक येथे येऊन फिर्यादीच्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही केला होता. त्यावेळी त्याने तो इंडियन ऑइल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरीस असल्याचे तसेच त्याचा पाषाण रोड, पुणे येथे स्वतःचा मालकीचा पेट्रोल पंप असल्याचे महिला व तिच्या नातेवाइकांना सांगितले.
तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टवर ट्रस्टी असल्याचे सांगून ट्रस्टतर्फे लिलाव करण्यात येणारे सोने त्यांच्या लग्नासाठी स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांची व त्यांच्या बहिणीची १ लाख ६०० रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी महिलेने पंचवटी पोलिस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रतीक पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये सिल्व्हासा, गुजरात त्याला अटक केली होती.
तिथे तो स्वराज सुरेश देशमुख नावाने राहत होता. परंतु, त्याच्याकडे केलेल्या चौकशीदरम्यान त्याचे खरे नाव सुमेश सुरेश पोस्कर असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी न्यायालयासमोर मांडलेल्या परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे यशवर्धन सुरेश देशमुख ऊर्फ सुमेश सुरेश पोस्कर याला सात वर्षे कारावास व एक लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे.