
नाशिक | प्रतिनिधी Nashik
विविध गुन्ह्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या चार चाकी वाहनांनी आज अचानक पेट घेतल्यामुळे एकच खडबड उडाली. हा प्रकार शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात ( Mumbai Naka Police Station)घडला. यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आगीत दोन ते तीन चार चाकी वाहने जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेच्या अग्निशामक दलाने एक तास परिश्रम करून आग आटोक्यात आणली.
पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये कारवाईसाठी वाहने जमा करून मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवली आहे, मात्र पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीच्या बाहेरच्या बाजूला कोणीतरी व्यक्ती झोपला होता व त्याने काहीतरी जाळल्यामुळे ही आग लागल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. मात्र आग इतकी भयानक होती की काही क्षणातच त्याने रुद्ररूप धारण केले. यामुळे परिसरात धुक्याचे लोट पसरले होते.
विशेष म्हणजे ज्या वाहनांना आगी लागली त्याच्यात इंधन भरलेले होते, असे समजते. दरम्यान आग लागल्याचे समजताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी त्वरित बचाव कार्य सुरू केले. या दरम्यान अगोदर शेजारी असलेल्या एका दवाखान्यातील आग विझविण्याचे यंत्र आणून प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यात आग आटोक्यात आली नाही. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
शिंगाडा तलाव येथील दोन बंब या ठिकाणी दाखल झाले तर वीस जवानांनी एक तास परिश्रम घेतले आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही.