शिंदेगाव येथील मद्यसाठा लूट प्रकरणी चार संशयितांना अटक

शिंदेगाव येथील मद्यसाठा लूट प्रकरणी चार संशयितांना अटक

नाशिक । प्रतिनिधी

शिंदे गाव येथील लोहिया कंपाऊंड मधील राजस्थान लिकर कंपनीच्या गुदामावर पडलेल्या दरोड्यात 27 लाखाचा मद्यसाठा लूट प्रकरणी मद्य व गुदामाची माहिती दरोडेखोरांना देणार्‍या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

मंजुर रसुल पिंजारी (30, रा. वडाळागाव) व चंद्रकांत रामचंद्र सिनोरे (41, रा. सिन्नर) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. दरोडेखोरांनी शिंदे गाव येथे 9 मे रोजी रात्रीच्या सुमारास सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून तेथील सुमारे 27 लाख रुपयांचा मद्यसाठा लुटला होता.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट एक व दोनच्या पथकाने नवी मुंबई, पुणे, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तपास करुन परराज्यांमधील दोघा सराईत गुन्हेगारांना पकडले होते.

त्यांच्याकडील चौकशीतून त्यांना गुदामाची माहिती स्थानिक गुन्हेगाराने दिल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करुन मंजुर पिंजारी व चंद्रकांत सिनोरे यांना ताब्यात घेतले.

मंजुर पिंजारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात दरोडा, चोरी, घरफोडी असे 11 गुन्हे दाखल असून चंद्रकांत सिनोरे याच्याविरोधातही दरोडा, चोरी, आर्मक्ट असे तीन गुन्हे दाखल आहे.

सिनोरे याने गुदामाची रेकी करुन त्याची माहिती दरोडेखोरांना दिल्याचे समोर आले आहे. तर पिंजारी हा दरोड्यात सहभागी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीस 20 लाख रुपयांची तीन वाहने, 23 लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून सराईत गुन्हेगार मुक्तार अहमद शेख (35, रा. जम्मू काश्मिर), शंकर मंजू गौडा (44, रा. कर्नाटक) यांनाही अटक केली आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत चार संशयितांना अटक केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com