नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला आठ वर्षापासून रिक्त असलेल्या जागेवर जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिळाला खरा. मात्र, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंह वसावे यांना अद्यापही पदभार स्वीकारण्यास मुहुर्त सापडलेला नाही.

दरम्यान,वसावे यांच्याकडे सहाय्यक आयुक्तपदासह नंदुरबार व जळगाव येथील समाजकल्याण विभागाचा पदभार असतानाही नाशिक जि.प. जिल्हा समाजकल्याणचा अतिरिक्त पदभार सोपविल्याने चार पदांचा भार त्यांच्या डोई आहे.

त्यामुळेच त्यांनी आधीच तीन पदभार डोईजड झाले असल्याने नवीन पदभार घेण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पदभार स्वीकारला जात नसल्याने समाजकल्याण विभागातील निधीचे नियोजन रखडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेतील समाज कल्याण अधिकारी पद आठ वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे या पदाचा पदभार इतर विभागप्रमुखांकडे सोपवून कामकाज चालवून घेतले जात होते.आतापर्यत तब्बल सात ते आठ अधिकाऱ्यांकडे या पदाचा पदभार सोपविला गेला आहे.

अतिरिक्त पदभार असल्याने, संबंधित अधिकाऱ्यांकडून समाजकल्याण विभागाकडे दुर्लक्ष होते. परिणामी विभागातील अनेक योजना रखडतात, निधी वेळात खर्च होत नसल्याचे दिसून आले आहे. त्या तुलनेत सामाजिक न्याय विभागातील अधिकाºयांना मागासांच्या कल्याणांच्या योजनांची अधिक माहिती असते. त्यामुळे ते योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते.

यामुळे जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकायाचे पद रिक्त असल्याचा त्याचा अतिरिक्त पदभार समाजकल्याण सहायक आयुक्त अथवा जात पडताळणी समितीवरील संशोधिक अधिकारी यांच्याकडे सोपवावा, असे पत्र सामाजिक न्याय विभागाने ग्रामविकास विभागाला दिले होते.

त्या पत्रानुसार ग्रामविकास मंत्रालयाने नाशिक जिल्हा परिषदेला पत्र पाठवून समाज कल्याण अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त अथवा जात पडताळणी समितीवरील संशोधिक अधिकाऱ्यांकडे सोपवून त्याच्या कार्योत्तर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त वसावे यांच्याकडे समाजकल्याचा पदभार सोपविण्यात आला. पदभार देऊन आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी, अद्यापही त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही.

वसावे यांच्याकडे सहाय्यक आयुक्तांसह दोन पदभार असल्याने हा नवीन पदभार कसा स्वीकारणार? या बाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. समाजकल्याणच्या निधीचे नियोजन सुरू आहे. यात पदभार वसावे यांच्याकडे दिलेला असल्याने नियोजन कोणी करावी असा पेच निर्माण झाला आहे.