
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महिला क्रिकेटसाठी (Cricket) आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे, ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व शाल्मली क्षत्रिय या चौघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे....
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे गुवहाटी येथे आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी या चौघी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
माया सोनवणे, ईश्वरी सावकार व रसिका शिंदे यांनी यापूर्वी महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ व एकोणीस वर्षांखालील तसेच विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर शाल्मली क्षत्रिय ने यंदा १९ वर्षांखालील महिला संघाचे प्रतिनिधित्व केले.
माया सोनवणे ही उत्तम फिरकीपटू असून सातत्यपूर्ण कामगिरी च्या जोरावर मायाची लागोपाठ दोन हंगामात प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली होती व काही वर्षांपासून वरिष्ठ महिला संघाची सदस्य आहे. रसिका शिंदे जलदगती गोलंदाज व उत्कुष्ट फलंदाज असून शाल्मली क्षत्रिय उदयोन्मुख जलदगती गोलंदाज व सलामीवीर आहे.
तर ईश्वरी सावकारची यंदा १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धे नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ईश्वरी सावकारची कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली आहे. व तिच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.
गुवहाटी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत : १८ जानेवारी - हिमाचल प्रदेश, २१ जानेवारी - विदर्भ , २३ जानेवारी - हैद्राबाद ,२५ जानेवारी - गोवा , २७ जानेवारी - बिहार व २९ जानेवारी - उत्तराखंड.
या निवडीमुळे नाशिकच्या व खासकरून महिला क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, चौघींच्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, पदाधिकारी, सदस्य व प्रशिक्षक यांनी अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.