'ऑक्सिजन एक्सप्रेस'मधून नाशिक, नगरला मिळणार प्रत्येकी दोन ऑक्सिजन टँकर

'ऑक्सिजन एक्सप्रेस'मधून नाशिक, नगरला मिळणार प्रत्येकी दोन ऑक्सिजन टँकर
File Photo

नाशिक l प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी उद्या जिल्ह्याला विशाखापट्टणम येथुन येणाऱ्या 'ऑक्सिजन एक्सप्रेस' च्या माध्यमातून 25 के.एल. चे दोन टँकर प्राप्त होणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली...

उद्या सकाळी दहा वाजेच्या सुमारास देवळाली मालधक्का येथे 'ऑक्सिजन एक्सप्रेस' पोहोचणार आहे.

आज ही ऑक्सिजन एक्स्प्रेस व्यवस्थीतरित्या पोहोचावी यासाठी जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या समन्वयाने नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी श्री.मांढरे जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या ऑक्सिजन टँकरच्या नियोजनाची माहिती देताना म्हणाले की, देवळाली गावतील मालधक्का येथे आज विशाखापट्टणम येथून येणाऱ्या 'ऑक्सिजन एक्सप्रेस' ने नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी दोन ऑक्सिजन टॅंक पुरविण्यात येणार आहेत.

या एक्सप्रेसमार्फत प्राप्त होणारा ऑक्सिजन हा आपल्या जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यास आपणास मदत होणार आहे.

गेल्या काही दिवसात आपणास 85 मेट्रिक टन ऑक्सिजन ऐवजी 56 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त होत होता, यातील तफावत उद्या येणाऱ्या अधिकच्या 50 मेट्रिक टन ऑक्सिजन टँकरमुळे भरून निघणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले.

या 25 के.एल. च्या दोन ऑक्सिजन टँकरमुळे एकूण 50 मेट्रिक टन प्राप्त होणारा ऑक्सिजन एकाच दिवसात वापरून न संपवता, ज्याठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प आहेत, तेथे या ऑक्सिजनचा काही प्रमाणात साठा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. जेणेकरून अतिआवश्यक समयी साठवून ठेवण्यात आलेल्या या ऑक्सिजनचा वापर करणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

रेल्वे मार्गे येणाऱ्या ऑक्सिजन टॅंक च्या रेल्वे साठी दोन मोबाईल व्हॅन या ट्रकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रेल्वे मार्गाची पाहणी करतांना जिल्हाधिकारी यांच्यासमवेत रेल्वे प्रशासनाचे व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com