
सिन्नर | अमोल निरगुडे
सिन्नर तालुक्यात चोरांनी उच्छाद मांडला असून आज चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
तालुक्यातील भोकणी येथे आज (दि. 20) भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी जवानाच्या बंद घराचे कुलुप तोडुन दीड तोळयाचे सोने व लहान बाळाचे चांदीचे दागिने लंपास केले.
जवान दिनेश दामोदर सानप दिनेश हा केरळ येथे सैन्यदलात कार्यरत त्यांचे असुन वडिल दामु सानप, आई मंदा सानप, भाऊ पंकज सानप हे भोकणी फाटा रस्त्यावर पाऊतक्याजवळ वासत्यवास आहे. दुपारी पावणेतीनच्या सुमारास दामु सानप हे दुपारी झोपेतुन उठुन गावातील आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. त्यांची पत्नी व मुलगा घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात खुरपणीचे काम करत होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला.
कपाटाचे कुलुप तोडुन सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले. कपाटातील दिड तोळयाचे सोन्याचे दागिने व लहान मुलाचे दागिने चोरून पोबारा केला. यात 7 ग्रॅमचे कानातले, 2 ग्रॅमची चैन, 2 ग्रॅमचे ओमपान, 3 ग्रॅमचे कानातले जोड, चांदीचा छल्ला, चांदीच्या पट्या, लहान मुलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदिचे जोडवे, चांदीच्या तोळबंद्या चोरून फरार झाले. सानप हे घरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे
वावी येथे भरदिवसा फोडले घर
तालुक्यातील वावी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी भरदिवसा घरफोडी करून एक तोळे सोन्याची पोत व दहा हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना आज (दि.20) दुपारच्या सुमारास घडली.
वावी येथे शनीमंदिरा शेजारी राहणारे अशोक विठ्ठल शेलार कुटुंबासमवेत राहतात. दुपारच्यावेळी ते शेतात कामाला गेले असता अज्ञात चोरट्यांनी संरक्षक भिंतीवरून उडी मारून जात दरवाज्याच्या कडी कोयंडा तोडला. घरात प्रवेश करून कपाटातील एक तोळे सोन्याची पोत व रोख दहा हजार रुपये लांबविले. चोरट्याने जाताना घरातील टीव्ही सुरू ठेवला आणि दरवाजा लोटून घेतला.
सायंकाळी प्रमिला शेलार घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा लोटलेला दिसला. घरात आल्यानंतर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ आपल्या पाटील याबाबत माहिती दिली. घरातील दागिने लंपास झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती समजल्यानंतर ग्रामस्थांनी शेलार यांच्या घरी गर्दी केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
उद्योग भवन परिसरात घरफोडी
येथील उद्योगभवन परिसरातील द्वारकानगर येथे आज (दि.20) पहाटेच्या सुमारास धाडसी घरफोडी झाली. यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 4 लाख 70 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. शेती व्यवसाय करणारे राजू वंजारी व कुटुंबिय आपल्या मुलीला घेऊन दवाखान्यात गेले होते.
मुलीची प्रकृती ठीक नसल्यानी कुटुंबिय रात्रभर हॉस्पिटलमध्येच होते. पहाटे वंजारी हे घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला दिसून आला. घरात जाऊन बघितले असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी घरातील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह तब्बल 4 लाख 70 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला.
वंजारी यांनी तात्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. यावेळी श्वानपथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. ठसेतज्ञांनी काही ठसे मिळवत ते तपासणीसाठी पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचनामा करुन पोलिसांनी वंजारी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांंच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शहापूर येथे भरदिवसा घरफोडी करत 5 तोळ्याचे दागिने व 55 हजारांचो रोकड लंपास
तालुक्यात बंटी-बबलीच्या जोडीने उच्छाद मांडला एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत आहेत. तालुक्यातील कहांडळवाडीतील जवानांच्या बंद घरात घरफोडी केल्यानंतर आज (दि.20) दुसऱ्या दिवशी शहापूर येथेही या जोडीने दुपारी 2.30 च्या सुमारास शेतकर्याच्या बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरफोडी करत सुमारे 5 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 55 हजारांची रोकड लांबविल्याने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.
शहापुर गावात शरद सूर्यभान सांगळे यांचे घर असून सांगळे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर त्यांचे आईवडील व कुटूंबिय शेतात कामासाठी गेले होते. सांगळे यांच्या घराशेजारीच राहणारी त्यांची चुलती पमाबाई सांगळे ही घरापासून जवळच असलेल्या शेजार्यांकडे गेली होती. दुपारी 2.30 च्या सुमारास गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली सावळ्या रंगाची एक महिला व गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलेला व पंढरपुरी शालीने चेहरा झाकलेला पुरुष दोघेही प्लॅटीना मोटारसायकलवरून आले. सांगळे यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून संशयितांनी सांगळे यांच्या घरासमोर मोटारसायकल थांबविली.
दुचाकीवरुन उतरुन महिलेने फोनवर बोलण्याचे नाटक करत पाळत ठेवण्यास सुरुवात केली तर पुरुषाने सांगळे यांच्या घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत दरवाजाला आतुन कडी लावून घेतली व घरातील कपाटात ठेवलेले 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने व 55 हजारांची रोकड काढली. यादरम्यान जवळच शेजारी गेलेल्या पमाबाई सांगळे यांना आपल्या घराजवळ कोणीतरी महिला फोनवर बोलताना दिसल्याने त्यांनी जवळ येत सदर महिलेस विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता चालाख बबलीने फोनवरच जोर-जोरात मावशी-मावशी असे बोलून आत गेलेल्या साथीदाराला इशारा केला.
इशारा मिळताच चोरी केलेल्या दागिने व रोख रक्कमेसह तो बाहेर आला व काही कळण्याच्या आत दोघेही दुचाकीवर बसून पसार झाले. पमाबाई सांगळेंना त्यांच्या वर्तनाचा संशय आल्याने त्यांनी लागलीच आपला पुतण्या शरदला यासंदर्भात माहिती दिली. शरद यांनी लागलीच घराकडे धाव घेतली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सांगळे यांनी तात्काळ मुसळगाव एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.