बाजार समितीत करोना संसर्गाचा शिरकाव

लासलगावला सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव
बाजार समितीत करोना संसर्गाचा शिरकाव

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

एकीकडे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली असताना दुसरीकडे करोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे .

या करोना विषाणूने आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या कांद्याची बाजारपेठ लासलगाव बाजार समितीत देखील शिरकाव केल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कांद्याचे मुख्य बाजार आवार असलेल्या लासलगाव येथे 1 ऑक्टोंबर पासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रातच कांद्याचे लिलाव होणार आहे.

निफाड तालुक्यात करोना संसर्गाची लागण झालेल्या रुग्णात वाढ होत आहे. लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारातील कांदा लिलाव पुकारणार्‍या व्यापारी मदतनीसचा करोना संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला तर बाजार समितीच्या तिघे सेवकांना व कांदा निर्यातदार व्यापार्‍याला करोनाची लागण झाल्याने कांदा व्यापार्‍यांसह सेवकांचे धाबे दणाणले आहे.

लासलगाव बाजार समितीत दोन सत्रात कांद्याचे लिलाव होत होते. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकाळी 8.30 वाजेपासून कांदा आलेल्या वाहनातील लिलाव संपेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू ठेवण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली असता या मागणीचा विचार करत बाजार समिती प्रशासनाने 1 ऑक्टोंबर पासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव घेण्याचा निर्णय घेतला.

यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या जवळील कांदा हा लिलावासाठी सकाळच्या सत्रात आणावा असे आवाहन लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com