
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नोकरी महोत्सवाची (Job Festival) तयारी अंतिम टप्प्यात आली असून आज माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी या तयारीचा आढावा घेतला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कैलास मुदलीयार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, गौरव गोवर्धने, संजय खैरनार, योगेश निसाळ, आकाश पगार, चेतन कासव, आकाश कदम, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील बेरोजगारांना (Unemployed) सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (Nationalist Congress Party) पुढाकार घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट, फायन्सस, सेवा या क्षेत्रातील जवळपास ५० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असून नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जाणार आहे.
महोत्सवात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी यासह सर्वच विभागातील पात्रताधारक उमेदवारांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महोत्सवात नाशिक जिल्ह्यालगत असणाऱ्या विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.
दरम्यान, या भव्य नोकरी महोत्सवाचे उद्घाटन सोमवार (दि.७ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार, सरोज आहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, नाना महाले, डॉ. अपूर्व हिरे, जयंत जाधव, दिलीप खैरे, आनंद सोनवणे, अर्जुन टिळे, अशोक सावंत, निवृत्ती अरिंगळे, मधुकर मौले यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.