यंत्रमाग उद्योग संकट निवारणासाठी वस्त्रोद्योगमंत्र्यांना साकडे घालणार

माजी आ. शेख रशीद
यंत्रमाग उद्योग संकट निवारणासाठी वस्त्रोद्योगमंत्र्यांना साकडे घालणार

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

यंत्रमाग उद्योगाला ( Loom Industries ) संकटसमयी दिलासा देण्याचे काम यापूर्वी देखील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासन काळातच झाले आहे. सूत व कापडाच्या भावाच्या तफावतीमुळे यंत्रमाग उद्योग पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळे यंत्रमागधारक व कामगारांना दिलासा देण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी यासाठी लवकरच वस्त्रोद्योगमंत्री असलम शेख यांची भेट घेत आपण साकडे घालणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी आ. शेख रशीद ( former MLA Shaikh Rashid ) यांनी दिली.

येथील मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माजी आ. शेख रशीद यांनी यंत्रमाग उद्योगावर आलेल्या संकटाचे निवारण व्हावे, या दृष्टिकोनातून आपल्यासह माजी आ. आसिफ शेख यांचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. राज्य शासनातर्फे शेतकरी बांधवांना ज्या पध्दतीने लाभ दिला जात आहे त्याच धर्तीवर दुसर्‍या क्रमांकावर उद्योग असलेल्या यंत्रमागास देखील शासनाने लाभ द्यावा, अशी मागणी आपण वस्त्रोद्योगमंत्री असलम शेख यांच्याकडे करणार असल्याचे शेख रशीद यांनी सांगितले.

शहरात विरोधकांतर्फे यंत्रमाग धारक व कामगारांची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू आहे. काही संघटना यंत्रमाग कामगारांचा नव्हे तर त्यांच्या स्वत:च्या लाभासाठीच कार्यरत असल्याची टीका करत शेख रशीद पुढे म्हणाले, माजी आ. स्व. निहाल अहमद यांनी 30 वर्षे शहराचे लोकप्रतिनिधीत्व विधानसभेत केले. मंत्रीपददेखील त्यांनी भूषविले. मात्र येथील यंत्रमाग उद्योगाचा कायापालट ते करू शकले नाही.

आपण आमदार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्याने 56 कोटींचे वीजबिल माफ होवू शकले होते. यासाठी आपण विधानसभा प्रवेशद्वारावर आंदोलन देखील इतर आमदारांच्या मदतीने केले होते. आघाडी शासन काळातच शहरातील यंत्रमाग धारकांना विविध सवलतींचा लाभ मिळू शकला असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराची रोजीरोटी अवलंबून असलेल्या यंत्रमाग चालक व कामगारांचे नेते बनण्याची सर्वांनाच घाई आहे. मात्र यंत्रमागाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आजपर्यंत कुणी केला नसल्याचा आरोप शेख रशीद यांनी केला. मनपाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात विकासकामे केली जात आहे. कुठल्याही पक्षाला किंवा नगरसेवकांना झुकते माप देण्याचा प्रश्न नाही. विरोधकांना सेना-भाजपची मते चालतात परंतू आपल्याकडे ते आले तर चालत नाही. हिंदू-मुस्लीम असा जातीयवाद आपण करणार नसल्याचे शेख रशीद यांनी शेवटी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com