ग्रामपंचायती निवडणुकीतील मतभेद विसरा :छगन भुजबळ

महाविकास आघाडीला मोठे यश
ग्रामपंचायती निवडणुकीतील मतभेद विसरा :छगन भुजबळ

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

राज्यभरात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. मात्र गावाच्या विकासासाठी मतभेद तसेच पक्षभेद विसरून विजयी आणि पराजय झालेल्या सर्व उमेदवारांनी एकत्र यावे असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले आहे.

राज्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मन:पूर्वक अभिनदन व्यक्त करत गावाच्या विकासाच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या आहेत.

छगन भुजबळ यांनी ग्रामपंचायत निवडणुक निकालाबाबत म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेचा ग्रामपंचायत हा महत्वाचा कणा असून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत हे महत्वाचं केंद्र आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर त्यांचा परिणाम हा राज्याच्या विकासावर होत असतो.

नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतीतून होत असते त्यामुळे याठिकाणी काम करतांना एकमेकांमधील मनभेद, पक्षभेद बाजूला ठेऊन गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असते. आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर झाला यामध्ये महाविकास आघाडीला नागरिकांनी भरभरून असे मतदान केल्याचे बघावयास मिळाले आहे.

त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतो. तसेच जय व पराजय विसरून सर्वच उमेदवारांनी तसेच नागरिकांनी एकत्र येत गावाचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com