
सिन्नर | प्रतिनिधी | Sinner
तालुक्यातील रामनगर (Ramnagar) येथील शेतकऱ्याच्या विहिरीत भक्षाच्या शोधात असलेला मादी बिबट्या (Female leopard) विहिरीत (well) पडल्याची घटना आज (दि.२५) समोर आली. त्यानंतर वनविभागाने रेस्क्यू करत बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले आहेत...
रामनगर येथील शेतकरी (Farmer) शिवाजी केरु मंडले यांच्या गट नंबर २६५ मधील विहिरीत अंदाजे दीड ते दोन वर्षांची मादी बिबट्या पहाटेच्या सुमारास पडला. पाण्यात पडल्यानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर पडणे शक्य होत नसल्याने बिबट्याने डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी डरकाळ्यांचा आवाज ऐकून विहिरीकडे धाव घेतली असता बिबट्या पाण्यात (Water) पडल्याचे दिसून आले.
त्यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला (Forest Department) फोनद्वारे माहिती दिल्याने उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टिम तात्काळ घटनास्थळी पोहचली. यानंतर वनविभागाच्या सेवकांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला फिजिकली रेस्क्यू करत सुरक्षितपणे बाहेर काढून मोहदरी (Mohdari) येथील वनोद्यानात (Forest) हलविले आहे.
दरम्यान, यावेळी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनपाल एस. पी. झोपे, वनरक्षक किरण गोर्डे, गोरख पाटील, डी. एन. इघे, वसंत आव्हाड, तुकाराम डावरे, रोहित लोणारे यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी (Villagers) परिश्रम घेतले.