परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे उद्या नाशकात लसीकरण; जाणून घ्या सविस्तर

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे उद्या नाशकात लसीकरण; जाणून घ्या सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी

मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक महापालिकेने देखील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मंगळवारी (दि.१) शालिमार येथील महात्मा फुले कलादालनात लसीकरण शिबिर आयोजित केले आहे. दुपारी १२ वाजेपासून या लसीकरण सत्राला सुरूवात केली जाणार असून सुमारे १०० विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे...

नाशिक शहरात १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला आरोग्य सेवक, पोलिस व फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण करण्यात आल्यानंतर ६० वर्षावरील त्यापाठोपाठ ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली.

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण लसींच्या पुरेशा साठ्याअभावी तूर्त रोखण्यात आले आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यास उत्सूक आहेत. परंतू लसीकरण न झाल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे आवाहन महापालिकांना केले होते.

त्यानुसार मुंबई आणि पुणे महापालिकेने या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरूवात केली. त्याधर्तीवर आता नाशिक महापालिकेने देखील परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मंगळवारी(दि.१) लसीकरण सत्र आयोजित केले आहे.

नाशिकमधून परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे १०० पर्यंत आहे. अमेरिका, युरोप व इतर बहुसंख्य देशांमध्ये कोविशील्ड ही लस मान्यताप्राप्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांना कोविशील्ड लस देण्यात येणार आहे.

यासाठी लसींचा आवश्यक साठा महापालिकेला जिल्हा लस भांडारातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आय-२० किंवा डीएस-१६० अर्ज, परदेशी ॲडमिशन निश्चित झालेले पत्र, व आयकार्ड, पासपोर्ट फोटो परवाना सोबत आणावा, असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

परदेशातील नामवंत विद्यापीठात शिक्षणासाठी जाणे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाची बाब आहे. केवळ लसीकरणाच्या अभावी नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे.

कैलास जाधव, आयुक्त, मनपा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com