विल्होळी परिसरात बिबट्याचा वावर

विल्होळी परिसरात बिबट्याचा वावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विल्होळी परिसरात बिबट्या मादी दोन बछ्ड्यांसह दिसून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....

स्थानिक नागरिकांनी बिबट्या दिसल्याची माहिती वन विभागाला देताच त्या ठिकाणी वन कर्मचार्‍यांनी धाव घेतली. मात्र तोवर बिबट्याने तेथून धूम ठोकली. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला आहे.

देवळाली कॅम्प परिसरातील विजयनगर भागातही बिबट्याने कुत्र्याचे छोटे पिल्लू फस्त केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. याबाबत वन विभागाकडे विचारणा केली असता, आम्हाला कोणतीही माहिती नसल्याचे वनविभागाने सांगितले.

देवळली कॅम्पसह आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने स्थानिक नागरिकांकडून बिबट्याला कैद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली जाते आहे. पश्चिम वनविभागाच्या अधिकार्‍यांनी नाशिकच्या आजुबाजूच्या भागात एकूण पाच पिंजरे लावले आहेत.

विल्होळी परिसरात दिसून येणारा बिबट्या मागील काही दिवसांपासून या भागात वावरताना दिसून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी पश्चिम विभागाच्या कार्यक्षेत्रात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. देवळाली कॅम्प, पळ्से, शिंदे, मोहगाव, चाडेगाव, सामनगाव, हिंगनवेढे, दोनवाडे या भागात बिबट्याचा संचार अधिक दिसून आला होता.

बिबट्याच्या हल्यात दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बिबटे जेरबंद झाले होते.

दरम्यान उस तोडीचा हंगाम अद्याप सुरु झाला नसल्याने बिबट्याचा वावर कमी असल्याचे जाणकार सांगतात, असे असूनही देवळाली कॅम्प आणि विल्होळी भागात बिबट्याचा संचार दिसून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांना बिबट्या दिसल्यास त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com