फुटबॉलचा थरार : सौदी अरब, जपानचा अर्जेंटिना, जर्मनीला धक्का

फुटबॉलचा थरार : सौदी अरब, जपानचा अर्जेंटिना, जर्मनीला धक्का

आनंद खरे, क्रीडा समीक्षक

22 व्या विश्वचषकाच्या तिसर्‍या दिवशी सौदी अरबने मेस्सीच्या विश्वविजेत्या अर्जेंटिनाला धक्का दिल्यानंतर अगदी त्याच पद्धतेने जपानने जर्मनीला 2-1 असे पराभूत करून फुटबॉलमध्ये आता आशिया संघांना कमी न लेखता आम्ही कोणताही चमत्कार करू शकतो हे दाखवून दिले. पहिल्या दिवशी यजमान कातारला इक्वाडोरने तर दुसर्‍या दिवशी हॅरी केनच्या नेतृत्वात खेळणार्‍या इंग्लंडने इराणवर 6-2 असा मोठा विजय मिळवून दिल्यावर या विश्वचषकामध्ये सहभागी झालेल्या आशिया खंडाच्या सहा संघांकडे केवळ सहभागापुरते बघितले जाते की काय अशी परिस्थिती दिसून येत होती.

परंतु सौदी अरबच्या संघाने सर्वात सर्वांच्या पहिल्या पसंतीत असलेल्या लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिनाला चक्क 2-1 असे पराभूत करून चमत्कार घडवला. आज याचीच पुनरावृत्ती जपानने केली. जपानने चारवेळा विश्वविजेत्या बलाढ्य जर्मनीला अशाच 2-1 फरकाने पराभूत करून सौदी अरब संघाचा विजय फ्लूक नव्हता हे सिद्ध केले. विश्वचषक स्पर्धेच्या या तापलेल्या वातावरणामध्ये सुरुवातीपासून कोणता संघ विजेता ठरणार याची चर्चा सुरू होती. यामध्ये सर्वात आघाडीवर अर्थात अर्जेंटिना, ब्राझील, जर्मनी, फ्रान्स, स्पेन हे संघ असतात. रोनाल्डोचा पोर्तुगाल, हॅरी केनचा इंग्लंड, रोमालू लुकाकूचा बेल्जियम यांचेही नाव आघाडीवर असते. परंतु आशिया खंडातील एकही संघ या विजेत्यांच्या यादीत नसतो. परंतु या दोन सामन्यांनंतर आता हे सर्व दिग्गज संघ कोणत्याही संघाला हलके घेणार नाही आणि घेऊ नये असा तोडीस तोड खेळ सौदी अरब आणि जपान या संघांनी करून दाखवला आहे.

सौदी अरबचा चत्मकार

अर्जेंटिनाच्या गेल्या दोन वर्षांच्या खेळावर नजर टाकली तर गेल्या 36 सामन्यांत त्यांना पराभव माहीत नव्हता. त्यामुळेच आपल्यापेक्षा कितीतरी मागे असलेल्या म्हणजे जागतिक क्रमवारीमध्ये 51व्या स्थानावर असलेल्या सौदी अरब संघाला अर्जेंटिना किती गोलने पराभूत करतो याचीच चर्चा जास्त होती. परंतु सौदी अरबच्या खेळाडूंनी मोठा चमत्कार घडवला आणि अर्जेंटिनाला 1-2 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. सौदी अरबच्या खेळाडूंकडून चूक झाल्यामुळे अर्जेंटिनाला पेनल्टीही मिळाली आणि दहाव्या मिनिटाला मेस्सीने बॉल नेटमध्ये मारून 1-0 अशी आघाडी घेतली.

48 व्या मिनिटाला सेलेह अल शेहारने बॉलला जोरदार किक लगावून दोन बचावपटूंसह अर्जेंटिनाच्या गोलीलाही चकवले आणि 1-1 बरोबरी साधली. या गोलमुळे उत्साहित झालेल्या अरब आघाडीपटूंनी पुन्हा पाच मिनिटांनी अर्जेंटिनाला दुसरा धक्का दिला. सौदी अरबच्या सलाम अल डॉसरीने पुन्हा जोरदार किक लगावून दुसरा गोल झळकावत आपल्या संघाला चक्क आघाडीवर नेले. पिछाडीवर गेल्यावर अर्जेंटिना आणखी जोरदार आक्रमणे करणार हे माहीत असल्यामुळे अरबच्या बचावपटूंनी आणि गोलीने खरोखर प्रयत्नांची पराकाष्टा केली. अर्जेंटिनाकडून मेस्सीबरोबर मार्टिनेझ, अँजेल डी मारिया, रोड्रिगेझ यांनी किमान चारवेळा थेट सौदी अरबच्या गोलजाळ्यात बॉल पाठवण्यात यश मिळवले. परंतु ऑफ साईडमुळे हे गोल नाकारले गेले.

अर्जेंटिनाकडून सर्वांनी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु सौदी अरबचा गोली महंमद अल अवैसने आपल्या बचावात जान टाकली आणि मेहनत करून आपला गोल वाचवण्यात यश मिळवले. त्यांच्या बचावाच्या प्रयत्नात त्यांना सहा पिवळे कार्डही मिळाले. परंतु त्यांनी आपली आघाडी वाचवण्यात यश मिळवले आणि चमत्कार घडवत बलाढ्य अर्जेंटिनाला 2-1 असे पराभूत करून एकच खळबळ घडवली आहे. आता अर्जेंटिनाला बाद फेरीत जाण्यासाठी पुढील दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

जपानचा जर्मनीला धक्का

जर्मनीच्या इथल्ले गुंडोगींनीने आपल्या पहिल्या सामन्यात पेनल्टीवर गोल करून 1-0 आघाडी मिळवली. उत्तरार्धात कालप्रमाणेच जपानने जर्मनीला दोन धक्के दिले. खरे तर या सामन्यात जर्मनीच्या खेळाडूंनी वर्चस्व राखून गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. प्रतिआक्रमणामध्ये जपानने बाजी मारली. 74 व्या मिनिटाला मैदानात उतरलेल्या जपानच्या रितृ दोनाने गोलसमोर मिळालेल्या पासवर जोरदार किक मारून या विश्वचषकामधे सर्वात अनुभवी जर्मनीचा गोली मॅन्युअल न्यूएरला चकवले आणि बरोबरी साधली. त्यानंतर जपानच्या रिकेलों असानोने पुन्हा उजव्या बाजूने आक्रमण करून जर्मनीचा बचावपटू अ‍ॅन्टिनोवो रॉड्रिगेझ आणि अनुभवी गोली मॅन्युअल न्यूएरला पुन्हा चकवत अगदी कमी अँगलवरून गोल नेटमध्ये मारून दुसरा गोल झळकवला. या पिछाडीमुळे हतबल झालेल्या जर्मनीच्या प्रशिक्षकांनी नवे खेळाडू मैदानात उतवरून किमान बरोबरी करण्याचे प्रयत्न केले. परंतु कालच्या सौदी अरबप्रमाणे जपानचा गोली आणि बचावपटूंनी आपले काम चोख बजावत दुसरा उलटफेर घडवून आणला. या ईफ गटात दुसरा विश्वविजेता स्पेन असल्यामुळे आता या गटातून पुढे जाण्यासाठी जर्मनीला वेगळा चमत्कार करावा लागेल.

फ्रान्सचा सोपा विजय

विश्वविजेत्या फ्रान्सने ऑस्ट्रेलियावर 4-1 असा सहज विजय मिळवला तरीही आठव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने गोल करून दबाव निर्माण केला. परंतु फ्रान्सच्या खेळाडूंनी पूर्वार्धात दोन आणि उत्तार्धात दोन गोल करून हा विजय सहज केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com