अन्न व्यावसायिकांनो... कायदा पाळा कारवाई टाळा

अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
अन्न व्यावसायिकांनो...
कायदा पाळा कारवाई टाळा

सातपूर । Satpur

कोविड-19 काळात उदभवलेल्या परिस्थितीमुळे उदर निर्वाहाचे साधन म्हणून बहुंतांश व्यावसायिक अन्न पदार्थाच्या व्यवसायाकडे वळत आहेत.

त्यामुळे घरगुती अन्न पदार्थ तयार करणारे, चहा स्टॉल, डबे, भाजीपाला, फळे आदी व्यवसायाकडे लोकांचा कल असुन, नवीन व्यवसाय सुरु होत आहेत. नवीन अन्नव्यवसाय करतांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार परवाना, नोंदणी घेणे आवश्यक आहे.

परवाना आथवा नोंदणी करून घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मोहीम आखली असुन, त्यामध्ये रस्त्यावर व्यावसाय करणारे, वाहने घेऊन व्यवसाय करणारे दुध, नाश्ता, चहा, फरसाण आदी विक्रेत्यांनी कायदेशीर नोंदणी करूनच व्यवसाय करावा असे आवाहन करण्यात अन्न व औषध प्रशासनाचे नाशिक विभागाचे सह आयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी केले.

तथापी हे सर्व व्यावसायिक नवीन असल्यामुळे व त्यांना या बद्दल माहिती नसल्यामुळे ते नोंदणी, परवाना न घेता व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या उदर निर्वाहाच्या प्रश्रासोबतच जनतेचे आरोग्यही तेवढेच महत्वाचे आहे.

यासाठी उत्पादक, वितरक, होलसेलर्स यांची मोठी जबाबदारी आहे. नविन व्यावसायिकांकडे परवाना, नोंदणी आहे किंवा नाही हे तपासले जाईल. नोंदणी केलेली असल्यास ते स्वतः दंडात्मक कारवाईतून वाचू शकतात.

सर्व अन्न व्यवसायाची घाऊक विक्रेता वितरक यांनी विना नोंदणी, परवाना घारकांना अन्न पदार्थाची विक्री केल्यास परवाना अट क्र-14 चे उल्लंघन होते व सदर गुन्हा हा दंडास पात्र राहील असेही त्यांनी सांगितले.

नोंदणीसाठी काय करावे...

12 लाख रुपयाखाली वार्षिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांसाठी परवाना काढणे बंधनकारक आहे. तर त्याखालील उलढाल असलेल्या व्यावसायिकांना नोंदणी करणे गरजेचे आहे.

नोंदणीसाठी वर्षाला शंभर, पाच वर्षाला 500 रुपये फी आकारली जाते. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावयाची असून यासाठी आधार कार्ड अथवा फोटो ओळखपत्र व स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो फॉर्म सोबत औषध प्रशासनाच्या वेबसाईटवर नोंदवणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com