सिन्नर
सिन्नर
नाशिक

साखळी तोडण्यासाठी कंटेनमेंट नियमांचे पालन करा

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांची सूचना

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर । Sinner

नाशिक महानगरपालिका क्षेत्रा खालोखाल जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. ही चिंतेची बाब असून अशा परिस्थितीत व्यवसायिकांसोबत सामान्य नागरिकांनी एकी दाखवणे आवश्यक बनले आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर गावात लागू करण्यात येणाऱ्या प्रतिबंधित (कंटेंटमेंट) क्षेत्रात नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिहा बनसोडे यांनी केली.

सिन्नर तालुक्यातील वावी येथे कंटेनमेंट क्षेत्र पाहणीसाठी त्यांनी आज (दि.२३) भेट दिली. सरपंच नंदा गावडे, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, साहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, आरोग्य अधिकारी डॉ. लहू पाटील, डॉ.अजिंक्य वैद्य, ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात करोना चा वाढता संसर्ग पाहता ग्रामीण भागात संभाव्य उद्रेक थांबवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यासाठी कंटेनमेंट नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांसह सामान्य नागरिकांवर देखील आहे. आपल्या भागातील संशयित व आजारी व्यक्तींबाबत आरोग्य केंद्रात माहिती दिली जावी. करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे. बाजारपेठांमध्ये अनावश्यक गर्दी टाळावी. घराबाहेर पडताना मास्कचा प्राधान्याने वापर करणे आवश्यक राहील याकडे बनसोडे यांनी लक्ष वेधले. आपण स्वतः, आपल्या जवळची किंवा संपर्कात आलेली दूरची कोणतीही व्यक्ती करोना संक्रमणास कारणीभूत असू शकते. त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक अंतराचे भान राखणे आवश्यक आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ग्रामीण भागात कंटेनमेंट क्षेत्रात नागरिकांचे होणारे हाल पाहता शासन स्तरावर सूचना मागवण्यात येतील. शेतकरी, व्यवसायिक यांना कमीत कमी त्रास होईल या दृष्टीने नियोजन कसे करता येईल याबाबत पुढील काळात शासन निर्देशानुसार निर्णय घेतले जातील. करोना संक्रमण रोखण्यासाठी डॉक्टर, पोलिस, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आता ग्रामस्थांची साथ मिळणे आवश्यक राहील.

Deshdoot
www.deshdoot.com