पुष्पोत्सवाची सांगता

नागरिकांचा मोठा प्रतिसाद
पुष्पोत्सवाची सांगता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचा उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग आणि नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटीझन फोरम यांच्या सहकार्याने आयोजित पुष्पोत्सव 2023चा काल समारोप झाला. शेवटच्या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे दोन लाख लोकांनी तीन दिवसांत पुष्प महोत्सवाला भेट दिली. विक एन्ड असल्याने पुष्पप्रेमींसह अनेक नागरिकांनी आवर्जुन मनपा मुख्यालयाला भेट देऊन फुलांची रंगेबेरंगी दुनिया अनुभवली.

काल संध्याकाळी प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे, चिन्मय उद्गीरकर उपस्थित होते. उद्यान विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही अभिनेत्यांनी मुख्यालयातील विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. फुलांच्या जाती आणि कुंड्यांच्या सजावटीला दाद दिली. वैशिष्ट्यपूर्ण फुलांची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायक्लोन ग्रुप डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी गोदातिरी स्वच्छतेची वारी विषयावर पथनाट्य सादर केले. डॉ. मुंढे यांनी भारत गणेशपुरे, चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री शिवकांता सुतार यांचा सत्कार केला.

भारत गणेशपुरे यांनी आपल्या विनोदी शैलीत भाषण करून उपस्थितांना हसविले. नाशिकच्या समृद्धीत गोदावरीचा वाटा आहे. तिला स्वच्छ ठेवा. नागरिकांनीही जबाबदारीने वागून परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले. चिन्मयने पुष्पोत्सवाचे कौतुक करून गोदावरी बारामाही वाहती करणे, पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत करणे नाशिककरांचे कर्तव्य आहे, असे भाषणात सांगितले.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने आणि सदस्यांचा, छायाचित्र स्पर्धेचे नियोजन करणारे योगेश कमोद, मनपाचे सहा उद्यान निरीक्षक, संतोष मुंढे यांचा सत्कार करण्यात आला. मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी, विभागीय अधिकारी मयूर पाटील, आयटी विभाग संचालक नितीन धामणे, सुरक्षा अधिकारी मधुकर शिंदे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यावेळी उपस्थित होते. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

विजेत्यांचा सत्कार

पुष्पोत्सव 2023 निमित्त आयोजित हौशी, व्यावसायिक आणि प्रेस फोटोग्राफर स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षक निसर्ग छायाचित्र तज्ञ डॉ. श्रीश क्षीरसागर, चित्रकार तथा मूर्तिकार श्याम लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मनपाच्या सहा विभागीय कार्यालयांनी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर साकारलेल्या उद्यान प्रतिकृतीत प्रथम आलेला सातपूर विभाग, द्वितीय नवीन नाशिक विभाग, तृतीय पंचवटी विभागाचा यावेळी सत्कार करण्यात आला. इएसडीएस वास्तू ग्रुप, ठक्कर ग्रुप ट्रॉफी प्रायोजक होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com