पूर आला... पूर आला...

पूर आला... पूर आला...

नाशिक । शुभम धांडे Nashik

नाशिक शहर आणि धरण क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने धरणातून पाणी सोडायला सुरुवात झाली होती. या सगळ्यात नित्यनेमाने ‘देशदूत’ कार्यालयात चर्चेसाठी जमणारे ‘देशदूत’ प्रतिनिधी पुराच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच ग्राऊंड रिपोर्टिंगसाठी गोदाघाटी बालाजी मंदिराच्या एका प्रशस्त मीटिंग हॉलमध्ये जमले. तिथूनच आज बाहेर पडणार्‍या पावसासोबत आतमध्ये गरमागरम चहासोबत मागील पुराच्या आठवणीत शक्यता असलेल्या पुराच्या वृत्तांकनाचे नियोजन ठरले.

बालाजी मंदिराच्या बाल्कनीतून सर्वांनी खळखळणार्‍या गोदावरीतीरी सुरू असलेली गडबड, धावपळ आणि पोटापाण्यासाठी असलेला रहाट गाडग्याला सुरक्षित ठिकाणी नेणार्‍यांची कसरत प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आणि जो तो आपल्या मार्गाला लागला.

तिकडे सावधान.. सावधान.. सावधान.. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे. कोणीही नदी परिसरात गर्दी करू नये, वाहत्या पाण्यात उड्या मारण्याचे वेडे धाडस करू नये. नागरिकांना सूचना करण्यात येते की त्यांनी आपआपल्या सामानासह स्वतः सुरक्षित ठिकाणीं पोहोचावे, अशा सूचना ध्वनीक्षेपणातून गोदातिरी असलेल्या प्रत्येकाला देण्यात आल्या.

तसे पूर आला... पूर आला ची दवंडीच जणू परिसरात फिरली आणि एकच आवाज कानी येवू लागले. अरे..! पाणी वाढतय. इकडून दोर धर,ओढा ओढा, जाऊ द्या पुढे. काळजी करू नका, ही आरडा ओरड सुरू. गोदाघाट परिसरात असलेली छोटीमोठी फिरती दुकान सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी होती. तर मध्ये सराफ बाजार, भांडी बाजार गल्लीत, सामान भरायला घ्या. आवरा लवकर आवरा म्हणत दुकान खाली होत होती.

दुकानातला माल पुराचं पाणी लागणार नाही अशा उंचीवर नेऊन ठेवण्याची लगबग युद्ध पातळीवर सुरूच होती. कारण आता दोन रुपयाच्या धंदा करू म्हणून जर दुकान आवरलं नाही तर पुढे पुरामुळे लाखोंचे नुकसान कोणालाच परवडणारे नव्हते. त्यातल्या त्यात कोविडच्या लॉकडाऊनची झळ बसल्यानंतर तर अजिबातच नाही.

हया सगळ्यात इकडे आहे ते वाचवण्यासाठी ही धावपळ सुरू असताना, तिकडे मात्र होळकर पूल, रामसेतू, गाडगे महाराज पूल यांच्याही पुढे जावून अतिउत्साही बघ्यांची नदीपात्राच्या पाण्यातही मोठी झुंबड उडाली होती. सेल्फी, व्हिडिओ, घोळक्याने फिरत चित्रं विचित्र आवाज काढत मस्तीला उत आलेला पाहायला मिळत होता.

असे म्हणतात की, नदी ही संस्कृतीचे दर्शन घडवते. आज पुन्हा ते सिद्ध झालें. एकीकडे महापूर येणारे म्हणून आणि त्यातल्या त्यात गोदा सौंदर्यीकरण करण्याच्या नावावर गोठलेल्या गोदामाईच्या पात्रामुळे पुराखाली जाणारा व्यवसाय वाचवणारी माणसे दिसतं होती आणि दुसरीकडे निसर्ग चमत्कार, आम्हाला हक्क आहे, आमची मर्जी ,आम्हाला काय होत म्हणून मनसोक्त आनंद घेणारी संस्कृतीची ही दुसरी माणसे.

झाले काहीच नाही, पूर आला.. पूर आला म्हणत कुठे चिंता तर कुठे आनंदाला उधाण आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com