फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसायाला करोनाचे ग्रहण

व्यवसायावर अवलंबून असलेल्यांची जगण्यासाठी धडपड
फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसायाला करोनाचे ग्रहण

पंचवटी | Panchavti

मागील काही वर्षांत नव्या तंत्रज्ञानामुळे वेगाने विस्तारलेला फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसायाला यंदा कोरोनाचे ग्रहण लागले आहे. यात कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात सुमारे २०० ते २५० लहान मोठे फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिक असून या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १५०० च्या घरात आहे. कोरोनामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांचे अर्थचक्र थांबल्याने त्यांना यातून सावरण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.

नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसायाला गेल्या काही वर्षांपासून सोनेरी दिवस आलेले आहे. पूर्वी कोणत्याही कार्यक्रमाचे फलक, बॅनर्स कापडावर रंगविले जायचे. हे काम पेंटर करून घेत असताना कामात वेळ खूप जायचा आणि खर्चही खूप होत असे. मात्र या नंंतर फ्लेक्‍स प्रिंटिंग तंत्रज्ञान आल्यावर तर या व्यवसायाने कातच टाकली होती.

पूर्वी केवळ कार्यक्रम, राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसाठी बनविले जाणारे फ्लेक्‍स बॅनर्स आता अगदी बारशाच्या कार्यक्रमापासून लग्न, घरगुती सण, छोट्या, मोठ्या बैठकांपर्यंत बनविण्यात येऊ लागले. लॉकडाउन सुरू झाले आणि हे सारेच बंद झाले. लग्न सोहळे , राजकीय सभा, मेळावे अश्या सर्वच कार्यक्रमावर बंधने आलीत.

करोनामुळे मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. त्यानंतर सरत्या वर्षात काही प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बंधने शिथिल करण्यात आल्याने कुठेतरी फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसायिकांना आशेचा किरण दिसत असतानाच पुन्हा यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाने उग्ररुप धारण केल्याने पुन्हा या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

आजमितीस नाशिक जिल्ह्यात २०० ते २५० फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिक असून या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या दीड हजारच्या जवळपास आहे. यात अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली असून लॉकडाऊनच्या काळात काहींचे बँकेच्या कर्जाचे हप्ते थकले आहे. या सर्वांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

करोनाची परिस्थिती लवकर नियंत्रित न झाल्यास या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो कर्मचारी कायमचे रस्त्यावर येण्याची भीती असल्याने त्यांना शासनासह, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, विविध मित्र मंडळांनी पुढाकार घेऊन कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत उभारी देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची मागणी होत आहे.

करोनामुळे फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात दोनशेहून अधिक व्यावसायिक आणि दीड हजारच्या आसपास कर्मचारी यात आहे. यांचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून आहे.

करोनामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वांचे जगणे कष्टमय झाले आहे. लॉकडाऊन काळात कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याने काही व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहे. शासनाने फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसायावर अवलंबून असलेल्याना उभारी देण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

- भालचंद्र पवार,

सचिव- नाशिक जिल्हा फ्लेक्स प्रिंटिंग असोसिएशन

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com