स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : मनपा आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : मनपा आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन (Rajiv Gandhi Bhavan) येथे आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...

आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा झाला. मनपाच्या अग्निशमन दलाने सलामी दिली. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रगीत झाल्यावर आयुक्तांच्या हस्ते तिरंग्याचे फुगेही आकाशात सोडण्यात आले.

महापालिकेचे सर्व अधिकारी, सेवक यावेळी उपस्थित होते. ध्वजारोहण कार्य़क्रमानंतर महाकवी कालिदास कलामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम झाला. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या सीईओ लिना बनसोड, रोटरीयन प्रांतपाल आशा वेणुगोपाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोदावरीचे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृतीचा भाग असलेल्या गोदा कृतज्ञता व संवर्धन गीताचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शहरातील सर्व शाळांमध्ये गोदा गीत म्हटले जाणार आहे. मनपा शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांची ही संकल्पना आहे. या गीताचे संगीतकार संजय गीते, गायिका श्रावणी गीते आणि गीतकार सुरेखा बोऱ्हाडे यांचा महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देशभक्तीपर गीतांनी जिंकली मने

सांस्कृतिक कार्य़क्रमात देशभक्तीपर गीते सादर झाली. प्रसिद्ध गायिका रागिणी कामतीकर तसेच आयएमए आणि रोटरीच्या सदस्यांनी गीते सादर केली. त्याशिवाय महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, नगररचना विभागातील उपअभियंता रविंद्र बागुल, नाशिक रोड विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, नवीन नाशिक विभागीय अधिकारी मयुर पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागातील सेवक दीपिका मारु यांनीही आपल्या गाण्यातून प्रेक्षकांची मने जिंकली. सायक्लॉन डान्स अकॅडमीच्या नृत्याविष्कारालाही दाद मिळाली.

अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड आदिंच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन रेडीओ जॉकी भूषण मटकरी आणि जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रोटरी एन्क्लेव्ह यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले. डॉ. आवेश पलोड यांनी कार्यक्रमाचं नियोजन केले होते. स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात रुजावी, या उद्देशाने स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवात महापालिकेतर्फे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com