विशेष प्रवेश फेरीत पाच हजार विद्यार्थ्यांना संधी

अकरावी प्रवेश प्रक्रिया
अकरावी प्रवेश
अकरावी प्रवेश


नाशिक | Nashik

अकरावीच्‍या सध्या सुरू असलेल्‍या प्रवेश प्रक्रियेंतर्गत विशेष फेरीची यादी जाहीर झाली. विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्‍या पसंतीक्रमानुसार या यादीत चार हजार ९१० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून दिली आहे. यादीत नावे असलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्‍चितीसाठी गुरुवार (दि. ३१)पर्यंत मुदत असणार आहे.

नाशिक महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत प्रक्रिया राबविली जाते आहे. याअंतर्गत यापूर्वीपर्यंत झालेल्या तीन फेऱ्यांमध्ये सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले होते. तरीदेखील दहा हजाराहून अधिक जागा रिक्‍त होत्‍या. या जागांवर प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे विशेष फेरी राबविण्यात आली.

या फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली. राज्‍य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्‍या धोरणानुसार एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्‍ल्‍यूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास मान्‍यता दिली असल्‍याने अशा विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्‍ती करण्यासाठी मुदत दिल्‍याने यादी उशिराने जाहीर करण्यात आली. या यादीतील विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत आपले प्रवेश निश्‍चित करावे लागतील.

पात्र विद्यार्थ्यांची शाखानिहाय संख्या

विज्ञान--------२ हजार ३२७

वाणिज्‍य------१ हजार ७२८

कला----------७१७

एचएसव्‍हीसी---१३८

कट ऑफ उंचावला

विशेष फेरीच्‍या गुणवत्तायादीत खुल्‍या प्रवर्गासह ईडब्‍ल्‍यूएस प्रवर्गातील कट ऑफदेखील उंचावला. यातून विज्ञान शाखेत नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना धडपड करावी लागत आहे. केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान (अनुदानित)साठीचा खुल्‍या प्रवर्गाचा कट ऑफ ८९.८ टक्‍के, ईडब्‍ल्‍यूएसचा ८४ टक्‍के राहिला.

वाणिज्‍य शाखेसाठी अनुक्रमे ८७.२ टक्‍के आणि ८१.२ टक्‍के कट ऑफ राहिला. आरवायके महाविद्यालयात खुल्‍या प्रगर्वाचा ८८.८ टक्‍के, ईडब्‍ल्‍यूएसचा ८३.४ टक्‍के, तर बीवायके महाविद्यालयात अनुक्रमे ८५.४ आणि ५९.२ टक्के कट ऑफ अनुदानित इंग्रजी माध्यमाच्‍या प्रवेशासाठी राहिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com