‘आरटीओ’त पाच हजार नव्या वाहनांची नोंदणी
नाशिक

‘आरटीओ’त पाच हजार नव्या वाहनांची नोंदणी

करोना संक्रमण काळात २१ कोटी रुपयांचा महसूल

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना संक्रमण व लॉकडाऊन काळात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात लहानमोठ्या अशा जवळपास सव्वा पाच हजाराच्या आसपास वाहनांची नोंदणी झाली आहे. यातून आरटीओला २१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. येत्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी सुरु होऊन महसुलात भर पडणार असल्याचा विश्वास आरटीओ अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे .

करोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले. सुरळीत सुरु असलेले जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाले. यामध्ये अनेकांच्या नोकर्‍या गेल्याने बेरोजगारी वाढली तर उलाढाल ठप्प झाल्याने मोठमोठे उद्योगधंदे बंद पडले. याचा सर्वात मोठा फटका वाहन उदयोगाला बसला. लॉकडाऊन झाल्यामुळे अनेकांनी नवीन वाहन खरेदी बंद केली. जुन्या वाहनांची खरेदी विक्री बंद झाल्याने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

मात्र,केंद्र आणि राज्य सरकारने विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रत्येक राज्याची आणि जिल्ह्यांची परस्थिती बघून लॉकडाऊन शिथिल करण्याचे निर्देश देऊन व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी दिली. अनेक बंद असलेले उद्योगधंदे पुन्हा सुरु झाल्याने मंदावलेली वाहन खरेदी पुन्हा एकदा जोमाने सुरु झाली आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यांनतर मे ते जुलै या तीन महिन्यात प्रादेशिक परिवहन विभागाने अडीच हजार वाहने नोंदणी केली. त्यातून २१ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. महिन्याकाठी आरटीओ विभाग २५ कोटी रुपये महसुलाचे टार्गेट ठेवून काम करते. मात्र, यावेळी करोनामुळे जवळपास पन्नास कोटीच्या महसुलावर पाणी सोडावे लागल्याचे समजते.

मे महिन्यात ९० दुचाकी,१०० चारचाकी आणि इतर २० अशा २१० वाहनांची नोंदणी करून आरटीओने चार कोटी रुपयांचा महसूल मिळविला. तर जून महिन्यात १८०० दुचाकी, ५१० चारचाकी, ५० रिक्षा आणि ४० मालवाहतूक करणारी वाहने आणि इतर ३५० अशी २७५० वाहनांची नोंदणी करून १० कोटी ५० लाख रुपये महसूल मिळविला आहे . जुलै महिन्यात आत्तापर्यंत १४०० दुचाकी,४०० चारचाकी आणि ५०० इतर अशी २३०० वाहनांची नोंदणी करून ६ कोटी पन्नास लाख रुपयांचा महसूल मिळविला आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर विविध प्रकारची सव्वा पाच हजार वाहने नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंद झाली आहेत. त्यातून २१ कोटींचा महसूल मिळविला आहे. सध्या महसूल कमी दिसत असला तरी येत्या काळात नवीन वाहनांची खरेदी वाढून मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची शक्यता वाटते.

- विनय अहिरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com