
पंचवटी | Panchavati
विधिसंघर्षित बालकांकडून चोरीच्या पाच दुचाकी दुचाकी हस्तगत करण्यात आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वाढत्या दुचाकी चोरीचा घटना बघता संबधित पोलीस ठाणे गुन्हा उकल करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव गुन्हे शोध पथक दुचाकी चोरट्यांचा माग काढत होते.
आडगाव पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चार संशयित चोरीच्या दोन दुचाकी विक्रीसाठी मेडिकल कॉलेज चौफुलीवर येणार असल्याचे समजले. या चारही संशयितांना सापळा रचून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता ते विधिसंघर्षित बालक असल्याचे समजले.
त्यांनी पंचवटी - २, आडगाव - २ ,उपनगर -१ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणात एकूण सहा विधिसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे, महिला पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव, भूषण देवरे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुरेश नरवडे, देवराम सूरंजे, ज्ञानेश्वर कहांडळ, संजय राजुळे, पोलीस नाईक निलेश काटकर, दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, निखिल वाकचौरे, अमोल देशमुख, सचिन बाहीकर, विलास चारोसकर, इरफान शेख व विश्वास साबळे यांनी कारवाई केली.