‘गोंदेश्वर’ मंदिराच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी

‘गोंदेश्वर’ मंदिराच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी

सिन्नर । Sinnar

सिन्नरच्या लौकिकात भर घालणार्‍या 12 व्या शतकातील गोंदेश्वर मंदिर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयतत्नांतून पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

केंद्र सरकारने गोंदेश्वर मंदिरास महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असा दर्जा दिला. अनेक पर्यटक या ठिकाणी भेटी देतात. मात्र, कालौघात या ठिकाणी शासनाकडून फारशा सुविधा दिल्या गेल्या नाही.

कोकाटे यांनी या मंदिराचे पर्यटनदृष्ट्या सुशोभीकरण करून परिसरात सुविधा देण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, मधल्या काळात रखडलेले हे काम पुन्हा हाती घेतले आहे.

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले. असून मार्च महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील आठ प्राचीन मंदिरांमध्ये गोंदेश्वर मंदिराचा समावेश करून या मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची घोषणा केली होती.

नुकताच राज्य सरकारने नगरविकास विभागामार्फत पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये वितरणाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी लवकरच विकासकामे सुरू होणार आहेत.

यात वैशिष्ट्यपूर्ण लाइट बसविणे, अ‍ॅम्फिथिएटर बांधणे, जॉगिंग व वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, तळ्यात संगीत कारंजे बसविणे, गोंदेश्वर मंदिराचे सुशोभीकरण, पर्यटकांना आवश्यक असणार्‍या मूलभूत सुविधा आदी महत्त्वपूर्ण कामे या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे उत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळ होताच पर्यटकांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com