
नाशिक | प्रतिनिधी
शेतीसोबतच पूरक व्यवसाय करण्याकडे अनेकांचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतीमधून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आता पूरक व्यवसायातुन उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. दिंडोरीरोडवरील म्हसरुळ येथील शेतकरी संतोष सोनवणे यांनीही शेतीला जोड धंदा म्हणून मत्स्यपालन सुरू केले असून, त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाकाळात हॉटेल व्यवसाय बंद झाल्यामुळे नवीन काहीतरी व्यवसाय सुरु करावा या विचारातून मत्स्य व्यवसायाची निवड केली. कमीत कमी जागेत उभारता येणारा व्यवसाय असल्याने त्याकडे लक्ष्य वेधले.बायोफ्लॉक फिश फार्मिंगची माहिती मिळवली. या गोष्टीचा अभ्यास करून कोरोनाकाळ असल्यामुळे माहिती मिळत नसल्याने ७ ते ८ महिने वयक्तिक अभ्यास करून या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सूरू केले.
प्रत्यक्षात मत्स्यपालनाला अल्पशा पाच टाक्यांपासून सुरुवात केली. पूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आपण हा प्रकल्प उभारला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य विकास विभागाद्वारे सेवा केंद्र मिळाले.
या सेवा केंद्राच्या मार्गदर्शनाखाली इतरत्र १२ प्रकल्प यशस्वीरित्या सुरु करण्यात आले आहेत. तर २६ लाभार्थी या योजनेचा सध्या लाभ घेत आहेत. आणखी ८५० टाक्यांच्या माध्यमातून या क्षेत्राला गती देण्याचा मानस असून, येथे मत्स्य सेवा केंद्र उभारण्यात आले आहे .यामध्ये २४ लाभार्त्यांना २ दिवसीय प्रशिक्षण देण्यात येत असून येथे प्रयोगशाळा देखील उभारण्यात आलेली आहे.
इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा कमीत कमी वापर करून हे उत्पादन घेतले जाते. ६ ते ७ महिण्यात हे उत्पादन विक्रीस येते. मत्स्य शेती करण्यासाठी पाण्याची टाकी बांधून एका टाकीमध्ये ३० हजार लिटर पाणी भरले जात असून ते ६ महिन्यापर्यंत बदलण्याची वेळ येत नाही. त्यामध्ये एका टाकीत तीन हजार बीज टाकले जातात व त्यामध्ये सरासरी २० टक्के मर पकडली जाते.
यामध्ये ३ प्रजातीची माशांची उत्पादने घेतली जातात. यामध्ये चिलापी पियेंगे , मरळ मासा यांचे उत्पादन अधिक घेतले जाते. ५० टक्के गुंतवणूक व ५० टक्के उत्पादन नफा असे या उत्पादनात मिळू शकते . या माशांची विक्री स्थानिक बाजारपेठेत २०० रु. किलो पर्यंत तर घाऊक बाजारपेठेत १०० रु प्रतिकिलो पर्यंत विक्री केली जाते.
बायोफ्लॉक फिश फार्मिंग मार्फत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी मोफत मार्गदर्शन केले जाते. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत मत्स्य विभागामार्फत सरकारकडून ७ , २५, ५० टाक्यांसाठी जनरल ला ४० टक्के तर एससी , एसटी व महिलांसाठी ६० टक्के सबसिडी दिली जाते . मत्स्य शेती हा व्यवसाय कमीत कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे.
यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या व्यवसायाकडे वळले पाहिजे. या व्यवसायात आधुनिक पद्धतीने कसे काम करायचे या बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रशिक्षण देखील दिले जाते तसेच पूर्ण व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली जाते.