नाशिक । Nashik

नाशिक महापालिकेत गेल्या 13 वर्षापासुन रिक्त पदाची व नवीन भरती झालेली नसल्याने मनुष्यबळा अभावी घरपट्टी व पाणीपट्टीतून सुमारे 400 कोटींचा तोटा झाला आहे. उत्पन्ना स्त्रोतावर परिणाम झाला असल्याने अगोदर मनपातील भरती करावी, त्यानंतरच 36 प्रकल्पग्रस्तांना सेवेत घेतले जाईल, अशी आक्रमक भूमिका आज (दि.21) महापौर सतिश कुलकर्णी यांनी मांडली.

नाशिक शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्वतंत्र कश्यपी धरणामुळे प्रकल्पग्रस्त ठरलेल्या 36 प्रकल्पगस्तांना मनपाच्या सेवेत घेण्यासंदर्भातील आदेश नुकताच शासनाने नाशिक महापालिकेला पाठविला आहे. शासनाकडुन कश्यपी धरण प्रकल्पग्रस्तांना मनपाच्या सेवेत घेण्यासंदर्भात महापालिकेला कळविण्यात आल्यानंतर हा आयुक्तांचा प्रस्ताव अद्यापही महासभेकडुन मंजुर झालेला नाही.

अगोदर अनेक वेळा तहकुब असलेल्या या विषयावर महासभेने शासनाकडुन आलेल्या आदेशावर वकीलाचा अभिप्राय घेण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यानंतर मनपाच्या वकीलांचे दोन अभिप्राय आल्यानंतर महापौरांनी अगोदर मनपातील नोकर भरती करा, मगच 36 प्रकल्पग्रस्तांना सेवेत घेऊन असा ठराव केला होता.

या एकुणच घडामोडीनंतर शासनाकडुन 36 प्रकल्पग्रस्तांना मनपाच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. याप्रकारानंतर महापौरांनी डिसेंबर 2020 च्या महासभेतील निर्णय व आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.

या शासनाच्या आदेशावर आपली भूमिका मांडतांना महापौर म्हणाले, हा आदेश देतांनाच नाशिक महापालिकेतील नोकर भरतीचा निर्णय शासनाने घ्यायला हवा. सन 1989 पासुन नाशिक मनपात नोकर भरती झालेूी नाही. महापालिकेत काम करायला कर्मचारी नसुन मनुष्यबळा अभावी घरपट्टी, पाणीपट्टी व इतर माद्यमातील येणार्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.

या माध्यमातून गेल्या काही वर्षात 400 कोटींपेक्षा जास्त तोटा महापालिकेचा झाला आहे. आजही महापालिका क्षेत्रात नवीन इमारती व घरे बांधुन तयार असुन अशाप्रकारे 50 ते 60 हजार घरांना अजुनही घरांना घरपट्टी लावता आलेली नाही. तर शेकडो इमारतीना नळांच्या जोडणी असुनही पाणीपट्टी बिल आकारणी झालेली नसुन पाणीपट्टी बिले वेळेवर दिली जात नसल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

नाशिक महापालिका ही एकमेव कमी मनुष्यबळावर काम करणारी एकमेव महापालिका असुन झपाट्याने विकास करणारे चौथे शहर असतांना याठिकाणी नोकर भरती करण्यात आलेली नाही. तेव्हा शासनाने अगोदर महापालिकेतील रिक्त पदे व नवीन पदांची भरती करावी, त्यानंतर या 36 प्रकल्पग्रस्तांना मनपात सामावून घेऊ, असेही महापौर कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.