आधी हवा अभ्यास, मग कृती!

आधी हवा अभ्यास, मग कृती!

राजीव पंडित, पर्यावरण अभ्यासक

आपला परिसर आणि आवरण हे सगळे मिळून ‘पर्यावरण’ (Environment) हा शब्द बनला आहे. निसर्ग आपल्यापासून वेगळा आहे, लांब आहे आणि त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे असे मानून सध्या अनेकजण काम करताना दिसतात. मात्र सर्वप्रथम आपण या चुकीच्या समजुतीतून बाहेर यायला हवे. पर्यावरण हा थेट आपल्या जगण्याशी संबंध असणारा विषय आहे.

हवामान बदल (Climate change) ही महत्त्वाची समस्या आहे. पृथ्वीवरील वाढता कचरा ही त्या मागोमाग भेडसावणारी समस्या आहे. कचर्‍यामध्येही जमिनीवरील आणि समुद्रात वाढत असणारा कचरा हे दोन भाग आहेत. आता समुद्रात वाढणार्‍या कचर्‍याने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे. पॅसिफिक महासागरात 50 किलोमीटर लांबीचा कचर्‍याचा तरंगता ढीग तयार झाला आहे. प्रदूषण हा तर कायमस्वरुपी भेडसावणारा प्रश्न आहेच.

जीवनावश्यक साधनांबरोबरच चैनीच्या साधनांच्या वापरामध्ये कमालीची वाढ झाली आहे. ‘वापरा आणि फेकून द्या’ संस्कृती आपल्याकडेही मूळ धरत आहे. हा नियम जवळपास प्रत्येक उत्पादनाला लागू पडत असल्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणण्याच्या अथवा नावीन्यपूर्ण डिझाईनच्या नावाखाली दर दोन वर्षांनी ग्राहकांना नवनवीन उत्पादनांची मोहिनी घातली जाते. सहाजिकच पूर्वीच्या वस्तू बाद होतात. पण त्या निर्माण करताना वापरले जाणारे बरेच साहित्य विघटनक्षम नसते. असे साहित्य कचर्‍यात मिसळते तेव्हा प्रश्न अधिक गंभीर होतो.

सध्या आपण प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरावर भर देत आहोत. कचर्‍याच्या डेपोमध्ये वाढत्या प्लॅस्टिकचा प्रश्न गंभीर होत आहे. विघटन न होणारे प्लॅस्टिक वाहून जाते आणि समुद्राच्या पाण्यात मिसळते. हे सगळे होताना प्लॅस्टिकचे अगदी बारीक तुकडे होतात. हे मायक्रो प्लॅस्टिक प्राण्यांच्या, माशांच्या शरीरात जाते आणि त्यांच्यामार्फत परत मानवी शरीरात प्रवेश करते. त्याचा असा उलटा-सुलटा प्रवास अनेक गंभीर प्रश्न निर्माण करतो.

इंधनाच्या अतिवापरामुळे (Excessive fuel consumption)पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्नांचे गुंते तयार झालेले आपण पाहत आहोत. अनेक पातळ्यांवर पर्यावरणस्नेही इंधन बनवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी अद्याप आपण हे

उद्दिष्ट पूर्णपणे गाठू शकलेलो नाही. सध्या विजेवर, हायड्रोजनवर चालणार्‍या गाड्यांचा बोलबाला आहे. पण ती गाडी चार्ज करताना विजेचाच वापर होतो. ही वीज पाण्यापासून आणि औष्णिक ऊर्जेतूनच तयार होते. म्हणजेच आपण पुन्हा एकदा ऊर्जेच्या त्याच साधनांचा वापर करतो, जे पर्यावरण संतुलन बिघडण्यास कारणीभूत ठरतात. समजा उद्या विजेवर चालणार्‍या वाहनांची संख्या वाढली तर नेमकी किती वीज लागेल? वाहने चार्ज करण्यासाठी विजेची मागणी वाढली तर ती कशी पूर्ण करणार? म्हणूनच पर्यावरण प्रश्नांवर तोडगा काढायचा असेल तर पाणी, वारा आणि सूर्यप्रकाश यांचा वापर करून कोणत्याही घातक उत्सर्जनाविना ऊर्जानिर्मितीचे पर्याय शोधणे गरजेचे आहे.

वनीकरण करताना देशी झाडे लावावीत. पण त्याही आधी त्या ठिकाणी काय होते, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. अशी अनेक ठिकाणे बघण्यात आहेत जिथे आता वनीकरण झाले असले तरी आधी माळराने होती. निश्चितच ही बाब पर्यावरणपूरक नाही. अशाच प्रकारे कोणताही अभ्यास न करता वन्यजीवांचा अधिवास असणार्‍या, त्यांचा वावर असणार्‍या अनेक भागातही वनीकरण केले जाते. ते टाळायला हवे. सध्या ‘सीड कलेक्शन’ या नवीन प्रकाराचे पेव फुटलेले दिसत आहे. देशी झाडांच्या बिया गोळा करून वाटप करायचे, त्यांची पेरणी करायची आणि देशी झाडांची संख्या वाढवायची हा यामागचा चांगला हेतू आहे. पण हा उत्साह इतका वाढला आहे की, कोणत्याही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाविना काही लोक प्रेरित होऊन बिया गोळा करण्यासाठी निघतात आणि अक्षरश: सगळे झाड झोडून त्यावरच्या बिया काढतात.

मग उत्साहाच्या भरात रोपण होऊ न शकणार्‍या अनेक बियाही तोडल्या जातात. झाडाखाली पडलेल्या सगळ्या बियाही गोळ्या केल्या जातात. या प्रयत्नामुळे जमलेल्या बियांमुळे शंभर टक्के वनीकरण झाले, असे क्षणभर गृहीत धरले तरी निसर्ग सगळ्या बिया नवीन झाड रुजवण्यासाठी वापरत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. त्यातल्या काही बिया पक्ष्यांना खाण्यासाठी असतात, खाली पडलेल्या बिया हे मुंग्या अथवा छोट्या किड्यांचे अन्न असते. काही बियांचे विघटन होऊन माती तयार होत असते. मात्र काहींच्या अतिउत्साहाने आणि अविचाराने निसर्गातली ही सगळीच प्रक्रिया थांबते. त्यामुळेच पर्यावरण रक्षणाचे कोणतेही काम विचाराने, पूर्ण अभ्यासानिशी करणे गरजेचे आहे. त्यासाठी तज्ज्ञांची, संशोधकांची मदत घ्यायला हवी. अन्यथा सगळे मुसळ केरात जायला वेळ तो किती लागणार?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com