द्राक्ष हंगामातील पहिला कंटेनर जर्मनीला रवाना

भारतीय द्राक्षांची चिलीशी स्पर्धा
द्राक्ष हंगामातील पहिला कंटेनर जर्मनीला रवाना

लासलगाव | Lasalgoan

द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेश झाला असून पहिला द्राक्षाचा 12.480 मॅट्रिक टनाचा कंटेनर जर्मनीला रवाना झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या वर्षी शेतकर्‍यांमध्ये आलेली मरगळ दूर करुन आता नव्या जोमाने हंगामासाठीची तयारी सुरू झालेली आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी करोना, हवामान, बाजारपेठ, निर्यात असे अनेक प्रश्न घेऊन आर्थिक परिस्थितीतही पुन्हा एकदा नव्या जोमाने लढण्यासाठी शेतकरी सज्ज आहेत. द्राक्ष उत्पादक महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.

केवळ द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असून चालणार नाही तर विक्रीच्या दृष्टीने नवीन बाजारपेठ, नवीन ग्राहक मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतीय कृषी मालाला बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याकरीता केंद्र सरकारने बांगलादेशमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्युटी कमी केली पाहिजे.

केंद्र सरकारने बांगलादेशची राजधानी ढाका येथे द्राक्ष निर्यातीसाठी रेल्वे उपलब्ध करुन दिल्यास देशातील मोठ्या प्रमाणात द्राक्ष ही बांगलादेशमध्ये निर्यात केली जातील आणि देशाला चांगले परकीय चलन मिळू शकते याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी बोलताना सांगितले.

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन 2018-19 हंगामात तब्बल 2 लाख 46 हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून 2335 कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. कृषिमाल निर्यात करताना प्रत्येक देशाच्या द्राक्षमण्यांचा आकार, द्राक्षघडाचे वजन, साखरेचे प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांचे अंश आदींवर आधारित काही निकष आहेत.

या निकषांचे पालन करीत भारतीय द्राक्षांनी परदेशात आपली ओळख निर्माण केली आहे. यावर्षी अनुकूल हवामानामुळे निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारी पासून द्राक्षहंगाम सुरू झाला आहे. यावेळी 45 हजारहून अधिक उत्पादकांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

भारतीय द्राक्षांची चिलीशी स्पर्धा

निर्यातक्षेत्रात भारतीय द्राक्षांची अनेक वर्षांच्या मोनोपॉलिला मागील काही वर्षापासून चिली या देशाने आव्हान दिले आहे. मागील वर्षी चिलीच्या द्राक्षांनी चांगलाच भाव खाल्ला होता. त्याचा परिणाम भारतीय द्राक्षाच्या निर्यातीवर झाला होता. चिलीत द्राक्षाच्या 30 ते 35 व्हरायटी आहेत. मात्र भारतातील द्राक्ष हे चवदार असल्याने त्यास परकीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भारतातील द्राक्षांना आता चिलीतील द्राक्षांशी स्पर्धा करावी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com