रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा पहिलाच प्रयत्न यशस्वी

असा झाला राज्यात ऑक्सिजन पुरवठा
रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा पहिलाच प्रयत्न यशस्वी

नाशिकरोड | Nashik

ऑक्सिजन एक्सप्रेसने देशात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा रेल्वेचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. ऑक्सिजन टँकरच्या जलद वाहतूकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. उच्च स्तरावर ऑक्सिजन एक्सप्रेसची देखरेख करण्यात आली.

रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसची वाहतूक एक आव्हान म्हणून स्वीकारली आणि कळंबोली ते विझाग आणि विझाग ते नाशिकपर्यंत पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस यशस्वीरीत्या चालविली. द्रवरूप मेडिकल ऑक्सिजन टँकरच्या वाहतूकीसाठी रेल्वेला विनंती करताच रेल्वेने विविध ठिकाणी त्वरित रॅम्प बनविले. मुंबई टीमने कळंबोली येथे फक्त २४ तासांत रॅम्प बनविण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे.

रो-रो सेवेच्या वाहतूकीसाठी रेल्वेला घाट सेक्शन, रोड ओव्हर ब्रिज, बोगदे, वक्र मार्ग, प्लॅटफॉर्म कॅनोपीज, ओव्हर हेड इक्विपमेंट आदी ठिकाणी बाधा लक्षात घेऊन संपूर्ण मार्गाचा नकाशा बनवायचा होता. कारण उंची ही यातील महत्वाची बाब असल्याने रेल्वेने वसईमार्गे वाहतूकीचा नकाशा तयार केला. उंची ३३२० मिमी असलेले रोड टँकर टी 1618 चे मॉडेल सपाट वॅगन्सवर ठेवणे शक्य असल्याचे आढळले. मुंबई विभागातील घाट विभागात ओव्हर डायमेंशनल कार्गो (ओडीसी) चालविण्याची परवानगी नसल्यामुळे वसईमार्गे जाणा-या दूरच्या मार्गाची निवड करण्यात आली होती.

वाहतुकीत धोका

ऑक्सिजन हे क्रायोजेनिक आणि घातक रसायन असल्याने, रेल्वेला अचानक वेग वाढवणे, कमी करणे हे टाळण्याच्या आवश्यकतेसह मध्येच दाब (प्रेशर) तपासणे आवश्यक असते. जेव्हा ते भरलेल्या अवस्थेत असते तेव्हा दाब वाढतो. तरीही रेल्वेने हे आव्हान म्हणून स्वीकारले. मार्गाचे नकाशे तयार केले, लोकांना प्रशिक्षण दिले आणि विशिष्ट आकाराचे टँकर वसई, सूरत, भुसावळ, नागपूर मार्गे विझागमध्ये नेऊ शकले.

कळंबोली ते विझाग मधील अंतर १८५० किलोमीटरहून अधिक आहे. ते या ट्रेनने ५० तासात पूर्ण केले. १०० टनांपेक्षा जास्त एलएमओ (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) असलेले ७ टँकर १० तासात लोड केले गेले आणि केवळ २१ तासांत नागपुरात परत आणले. उर्वरित ४ टँकर केवळ १२ तासांत नागपूरहून आज सकाळी १०.२५ वाजता नाशिकला पोहोचले आहेत.

वेळेत बचत

लांब पल्ल्यांसाठी ऑक्सिजनची वाहतूक रेल्वे गाड्यांद्वारे रस्ते वाहतुकीपेक्षा जलद होते. रेल्वेमार्गाने वाहतुकीस २ दिवस तर रस्त्यामार्गे ३ दिवस लागतात. रेल्वेगाड्या २४ तास धावू शकतात परंतु ट्रक चालकांना थांबा इ. घेण्याची गरज असते.

या टँकरच्या वेगवान वाहतूकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केले गेले होते आणि हालचालींचे निरीक्षण सर्वोच्च पातळीवर केले गेले होते कारण आम्हाला माहित आहे की आपल्या राष्ट्रासाठी हा कठीण काळ आहे आणि राष्ट्र आमच्यासाठी सर्वोपरी आहे. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com