उगावच्या व्यापारी संकुलातील दुकानांना आग
नाशिक

उगावच्या व्यापारी संकुलातील दुकानांना आग

लाखोंचे नुकसान

Abhay Puntambekar

उगाव । वार्ताहर

उगाव येथील संभाजी राजे व्यापारी संकुलातील दोन गाळ्यांना आग लागून लाखो रूपयांची हानी झाली आहे. याबाबतचे सविस्तर व्रुत्त असे की,उगाव ग्रामपंचायतीच्या बाजार तळातील संभाजी राजे व्यापारी संकुलातील श्रीराम हार्डवेअर व निर्मल क्रुषी सेवा केंद्र या दोन दुकानांना काल मध्यरात्रीच्या दरम्यान आकस्मित आग लागली.रात्री दोनच्या दरम्यान माल लोडिंग करून घरी परतणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही आग येताच त्यांनी आसपासच्या गाळाधारकांना फोन करून आगीची सुचना दिली.

या गाळ्यांमध्ये शेतीउपयोगी प्लास्टिक पाईप, ठिबक सिंचन साहित्य, ऑईल  व ईलेक्ट्रीक साहित्य आदी ज्वलनशील साहित्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या अग्निशमन बंबास पाचारण केल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी, निफाड पोलिस निरीक्षक बी.आर.सानप,पंचायत समिती सदस्य सोमनाथ पानगव्हाणे, रानवड मंडळ अधिकारी शितल कुयटे,तलाठी राजेंद्र गायकवाड, सरपंच मनिषा पगारे, ग्रामविकास अधिकारी जे.के.गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

या आगीत श्रीराम हार्डवेअरचे मालक समाधान मधुकर पानगव्हाणे यांचे ८० लाखाचे व निर्मल क्रुषी सेवा केंद्र मालक रामप्रसाद रमेश ढोमसे यांचे ६६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.

याच रात्री या परिसरातील तीन दुकानांच्या कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे. आगग्रस्त श्रीराम हार्डवेअरच्या मागील भिंतीस भगदाड पडल्याचे दिसून आल्यावर वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहे. निफाड पोलिस निरीक्षक बी.आर.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ.निकम व निचळ अधिक तपास करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com