
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) असलेल्या शिंदेगाव येथील नायगाव रोडवरील एमआयडीसी परिसरातील दोन कंपन्यांना रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आग लागली होती. सदरची आग विझण्यासाठी अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) कर्मचाऱ्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर तब्बल १८ तासांनी ही आग आटोक्यात आली असून यामुळे शिंदेगाव एमआयडीसी परिसरात (Shindegaon MIDC Area) असलेल्या इतर कंपन्यांनी व रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सदर आगीत तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदेगाव परिसरातील नायगाव रोडवर असलेल्या एमआयडीसी परिसरात तिरुपती लेनो ही बारदान कंपनी तर युनिले कोटिंग ही दुसरी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे आग (Fire) लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. मात्र, बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील शिंदेगाव, पळसे, चेहडी आधी भागात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुराचे (Smoke) लोट दिसू लागल्याने संपूर्ण भागात काळोख पसरला होता.
यावेळी आग लागल्याचे समजताच नाशिकरोड, सिन्नर येथील अग्निशामक दलाचे तब्बल १० ते १२ बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आग भडकली व त्यामुळे जवळच असललेल्या बारदान कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्रभर अग्निशामक दलाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सोमवार (दि.०६) रोजी सुद्धा काही प्रमाणात आग सुरूच असल्याने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी पाण्याचा मारा करून आग विझवली.
दरम्यान, या आगीचे वृत्त समजल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे (Nashik Road Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत माहिती घेतली. त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचे नाशिकरोड येथील अधिकारी व कर्मचारी बेंद्रे, साळवे, आहेर, गायकवाड, काळे, खर्जुल, जाधव, आडके, यांच्यासह आदींनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.