भंगार गोदामाला आग

लाखोंचे नुकसान
भंगार गोदामाला आग

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

जेलरोड येथील जुना सायखेडा रोडवरील भगवती लॉन्स जवळ असलेल्या भंगार, रद्दीच्या दुकान व गोडावूनला आज आग लागली. वेळीच अग्निशामक दल पोहचल्याने शेजारील दुकानांना याची झळ पोहचली नाही.

जेलरोड येथील जुना सायखेडा रोडवरील भगवती लॉन्स, ब्रिजनगर जवळ आयुब रशीद खान रा. वडाळा गाव, साहेबा नगर यांच्या मालकीचे रद्दी, प्लस्टिक, काचेच्या बाटल्याचे, दुकानवजा गोडावून आहे. आजूबाजूला देखील अनेक दुकाने आहेत. आज या रोडवरून फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना या दुकानातून धूर येताना दिसला. निकम नामक व्यक्तीने त्वरीत अग्निशामक दलाला कळवले. मात्र तोपर्यंत आगीने रुद्ररूप धारण केले होते. या आगीने दुकानातील सर्व सामान जाळून खाक झाले.

ही माहिती समजताच नाशिकरोड येथील दोन बंब, के.के. वाघ व मुख्यालयातील असे प्रत्येकी एक अशा एकूण चार बंबानी एक ते दीड तासांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये जवळपास एक ते दीड लाखाचे नुकसान झाले असल्याचे समजते. सदरची माहिती समजताच माजी नगरसेवक शरद मोरे, विशाल संगमनेरे, संतोष कांबळे, दर्शन सोनवणे, राहुल बेरड, राहुल बोराडे, मनोहर बोराडे, संजय बोराडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

जॉगर्स क्लबच्या अनेक नागरिकांनी गर्दी केल्याने आग विझवण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. मागील चार दिवसात वडनेर दुमाला येथील भंगारवजा फर्निचरच्या गोडावून, नाशिकरोड रेल्वे स्थानकात शालिमार एक्स्प्रेसच्या बोगीला लागलेली आग व आजची तिसरी घटना घडली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com