निष्काळजी नागरिकांकडून एक कोटींचा दंड

18 हजार जणांवर पोलिसांची कारवाई
निष्काळजी नागरिकांकडून एक कोटींचा दंड

नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा उद्रेक सुरू असतानाही शहरात निष्काळजीपणे फिरणार्‍या नागरिकांवर शहर पोलिसांनी प्रारंभापासून बडगा उचलला आहे. आतापर्यंत पोलिसांनी अशा 18 हजार 127 बेशिस्त नागरिकांवर कारवाई करत 1 कोटी 2 लाख 25 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. असे असतानाही अनेक नागरिक विनाकारण रस्त्याने भटकताना दिसत असल्याचे चित्र आहे.

शहरात तसेच जिल्हाभरात करोनाचा मोठा उद्रेक सुरू असून दररोज साडेतीन ते चार हजार करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. तर दररोज 40 जणांचा मृत्यू होत आहे. करोनाची ही दुसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना अनेक नियम, निर्बंध घातले आहेत. मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सतत हाताची स्वच्छता या त्रिसूत्रीसह वेळेचे बंधन, संचारबंदी, जमावबंदीचे पालन करण्यास सांगितले आहे.

मात्र अद्यापही अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक ठिकाणी विनामास्क, विनाकारण वावरत असल्याने करोना संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे अशा बेशिस्त नागरिकांवर शहर पोलीस कारवाई करत आहेत. त्यानुसार शहरातील परिमंडळ 1 व 2 मधील 13 पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत पोलिसांनी नाकाबंदी, फिरती गस्त करून बेशिस्तांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई नियमित केली जात असून बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांना पास देण्यात येत आहेत.

तसेच आता संचारबंदीकाळात विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. खबरदारी म्हणून रविवार कारंजा, दूध बाजार, जुने नाशिक, पंचवटी अशा मुख्य बाजारपेठेत वाहनांना बंदी आहे. पोलिसांकडून बेशिस्त नागरिकांवर कारवाई सुरू असूनही काही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका अद्याप आहे.

अशी कारवाई

परिमंडळ 1 : गंगापूर, सरकारवाडा, भद्रकाली, आडगाव, म्हसरूळ, पंचवटी व मुंबईनाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 10 हजार 350 बेशिस्तांवर कारवाई करत 51 लाख 24 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यात नऊ आस्थापनादेखील सील करण्यात आल्या आहेत.

परिमंडळ 2 : उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, अंबड, सातपूर, इंदिरानगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 7 हजार 777 लोकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 51 लाख 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com