...अखेर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली

शासन-प्रशासनाच्या एकीने ‘दुष्काळी’ ओळख संपुष्टात
...अखेर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

दरवर्षी फेब्रुवारी महिना संपला की वादवराडी ( Wadvradi Village ) गावच्या महिलांची पाण्यासाठी वणवण ( Strugle for water )सुरू व्हायची. मार्च-एप्रिल महिन्याच्या त्या तप्त उन्हात पाण्याने कासावीस झालेले गाव कुठेतरी आपल्या हक्काचे पाणी मिळेल या आशेवर कोसो दूर जात असत.

शासनस्तरावरून टँकरची व्यवस्था केली जायची पण टँकरची वाट बघण्यातच दिवस जायचा. मात्र, शासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने एकदा एखादे काम करण्याचे ठरवले तर ते काम पूर्ण होणारच. याचाच प्रत्यय अवर्षणप्रवण क्षेत्रातील चांदवड तालुक्यात आला आहे.

येथील वादवराडी ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगातून साडेआठ लाख रुपये खर्च करून सुमारे पावणेदोन कोटी लिटर साठवण क्षमतेच्या कृत्रिम साठवण तलावाची (artificial storage ponds) निर्मिती केली आहे. या तलावामुळे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात वापराच्या पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्याने गाव टँकरमुक्त झाले असून उन्हाळ्यात या गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी शासनाला दरवर्षी कराव्या लागणार्‍या लाखो रुपयांच्या खर्चाचीही बचत

झाली आहे. सध्या उन्हाळ्यात या तलावात पूर्ण पाणी भरले असून ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच शासकीय यंत्रणा यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे चित्र आहे. सद्यस्थितीत या गावातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गरज विहिरी व हातपंपावरून भागत असून वापरासाठी मात्र मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी पुरवूनही तलावात अद्यापही पाणी शिल्लक आहे. या तलावाला सुरक्षिततेसाठी जाळीचे कंपाउंडही करण्यात आले आहे.

साठवण तलावामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना हक्काचे पाणी उपलब्ध झाले आहे. साठवण तलाव उंचावर केल्याने ग्रामस्थांना ग्रॅव्हिटीने मुबलक पाणी मिळत आहे. यामुळे गावाची ’कायमस्वरूपी दुष्काळी’ अशी असलेली ओळख पुसली जाणार आहे. चांदवड गट विकास अधिकारी महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळ्यातील पाणीटंचाई पाचवीला पुजलेली होती.

वादवराडी गावाला उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत असल्याने तालुक्यात सर्वप्रथम या गावाची उन्हाळ्यात डिसेंबरमध्येच टँकरने पाणीपुरवठ्यासाठी शासनदरबारी मागणी होत होती. परिसरात खडकाळ जमीन असल्याने नैसर्गीक स्त्रोत नाही व त्यातच गावासाठी असलेली नाग्यासाक्या पाणीपुरवठा योजना बंद पडलेली होती.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाळ्यात वाहून जाणारे नैसर्गिक स्रोतांचे पाणी साठवून ते उन्हाळ्यात वापरण्याची संकल्पना पुढे आली. साठवण तलावाचे काम गावविकास कृती आराखड्यात समाविष्ट करून ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून साडेआठ लाख रुपये खर्च करून साठवणूक टाकी उभारण्यात आली.

या तळ्यात प्लास्टिक कागद अस्तरीकरण करून पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली. विहिरीतील व नैसर्गिक स्रोतातील वाहन जाणारे पाणी पावसाळ्यात पंप लावून या तळ्यात साठविण्यात आले. फेब्रुवारीपासून पाणीटंचाई भासू लागल्यानंतर या तळ्यातील पाणी पाइपलाइनद्वारे गावातील सार्वजनिक विहिरीत घेऊन ते नळाद्वारे गावातील सुमारे 125 कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

यातून ग्रामस्थांना टंचाईकाळात सुमारे चार महिने पुरेल इतके वापराचे मुबलक पाणी उपलब्ध झाले असून टँकर आल्यानंतर होणारे वादविवाद व महिला, ग्रामस्थांचा होणारा त्रास कमी झाला आहे. ऐन उन्हाळ्यात टंचाईचे तीन महिने ग्रामस्थांना या साठवण तलावातून पाणी पुरविण्यात आल्याने वादवराडी हे गाव टँकरमुक्त झाले आहे.

वादवराडी या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षाला सुमारे 15 ते 20 लाख रुपये खर्च येत होता. साठवण तलावातील प्लॅस्टिक कागदाची वयोमर्यादा सुमारे 10 वर्षे असून पुढील दहा वर्षांत शासनाच्या सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची बचत होणार आहे. ही योजना पूर्व भागातील परिसरातील दरेगाव, निमोण या गावांनाही राबवण्याचे विचाराधीन आहे.

महेश पाटील, गटविकास अधिकारी, चांदवड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com