गोष्ट तरसाची पिल्ले आणि आईच्या भेटीची..!

इथे पहा फोटो
गोष्ट तरसाची पिल्ले आणि आईच्या भेटीची..!

नाशिक । Nashik

सिन्नरच्या पांढुर्ली-शिवडे शिवारात ७-८ दिवसांची तरसाची पिल्ले सापडली. त्यांनी डोळे देखील उघडलेले नव्हते. त्यांची आणि त्यांच्या आईच्या भेटीची ही गोष्ट. ती सांगताहेत इको एको फाउंडेशनचे प्रमुख सदस्य व वाईल्ड लाईफ वॉर्डन वैभव भोगले आणि त्यांचे सहकारी.

त्यांना उचलून आणले!

त्या परिसरातील ग्रामस्थांना ही पिल्ले सापडली. जेव्हा केव्हा वन्यपशूंची पिल्ले सापडतात तेव्हा आम्ही लगेच त्यांना उचलून आणत नाही. तिथेच ठेवतो आणि त्यांच्या आईची भेट घडवून आणण्याचा लगेच प्रयत्न करतो. पण तरसाची पिल्ले जिथे सापडली ती जागा बऱ्यापैकी खोलगट होती. पाऊस पडल्यानंतर तिथे पाणी साठले असते. म्हणून ती पिल्ले आम्ही उचलून वनविभागाच्या विश्रामगृहात आणली.

तीन पिल्ले होती पण त्यातील एक जागेवरच मृत आढळले. ही पिल्ले उपाशी होती. त्यांच्या शरीराचे तापमान आणि वजन दर दोन तासाने ते तपासले जात होते. त्यांच्या बास्केटमध्ये टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या गरम पाण्याच्या पिशव्या ठेवत होतो. ती पिल्ले त्या पिशव्यांजवळ जाऊन झोपायची. त्यांच्या रूममध्ये हिटर लावले होते. त्यांच्या शरीराच्या तापमानानुसार त्यांना खाद्य दिले जात होते. त्यासाठी एक स्पेशल निप्पल येते. एकदा-दोनदा जबरदस्तीने खाऊ घातल्यावर तेच मस्तपैकी ओढून घ्यायला लागले. ते थोडेसे सेटल झाले आणि मग प्रयत्न सुरु झाले त्यांच्या आईची भेट घडवण्यासाठी.

आईची भेट घडवण्यासाठी...

जिथे ती पिल्ले सापडली त्या परिसरात आम्ही त्यांच्या आईच्या म्हणजे मादी तरसाच्या खाणाखुणा शोधल्या. त्या आम्हाला सापडल्या देखील. मग आम्ही त्या मार्गावर रोज रात्री पिल्ले नेऊन ठेवायला सुरुवात केली. पाऊस पडला की त्यांना उचलून न्यायचे आणि पाऊस गेला की पुन्हा नेऊन ठेवायचे. असेच सुरु होते. कॅमेरे देखील लावले.

पहिले एक-दोन दिवस काहीच घडले नाही. नंतरच्या दिवशी कॅमेऱ्यात मादी दिसली पण ती पिल्लांजवळ आली नाही. मग आम्ही त्या पिल्लांची जागा बदलली. पिल्लांच्या शी आणि शूचे कागद त्या मार्गात टाकले. जेणेकरून त्या वासाने आईने त्यांच्याजवळ यावे असा तो प्रयत्न होता. आमच्या त्या प्रयत्नांना यश आले आणि चार-पाच दिवसांच्या प्रयत्नानंतर आई येऊन तिची पिल्ले घेऊन गेली.

एकत्रित प्रयत्न!

वनविभागाचे कर्मचारी आणि वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, सिन्नर रेंजचे आरएफओ प्रवीण सोनवणे, एसीएफ पवार, इको-एको फाउंडेशनचे सागर पाटील आणि आयुष पाटील आणि पुण्याच्या द ग्रासलँड ट्रस्ट या संस्थांचे कार्यकर्ते यांनी एकत्रित प्रयत्न केले. कार्यकर्त्यांना तरसाच्या सवयींचा अभ्यास होता. मादी तरस तिच्या पिल्लाना तिच्यापासून लवकर वेगळे करत नाही हे त्यांचे निरीक्षण होते. बिबट्याची पिल्ले आणि मादी बिबट्याची अनेकदा भेट घडवून देण्याचा अनुभव होता. तो इथे उपयोगी पडला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com