दिंडोरी, कळवण नगरपंचायत ताब्यासाठी चढाओढ
दिंडोरी नगरपंचायत

दिंडोरी, कळवण नगरपंचायत ताब्यासाठी चढाओढ

दिंडोरी । नितीन गांगुर्डे Dindori

दिंडोरी नगरपंचायत निवडणूक Dindori Nagar Panchayat Election आरक्षणपाठोपाठ मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आता पॅनल निर्मितीसाठी प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे. आरक्षण सोडतीनंतर आता राजकीय गणिते बदलली असून अनेक प्रभागांत नवोदितांना संधी मिळणार आहे. यंदाच्या निवडणुकीत पॅनल नेतृत्वाचे चारित्र्य आणि शहराचा कायापालट करण्याची क्षमता यावर मतदान होणार असल्याने पक्षप्रमुखांची जय्यत तयारी सुरू झालेली आहे.

दिंडोरी नगरपंचायतीत आरक्षणात फारसे बदल झाले नाही. मात्र काही ठिकाणी लक्षवेधी बदल झाले. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. यंदाच्या आरक्षण सोडतीत सर्वप्रथम अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम करण्यात आले. त्यानंतर इतर मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत झाली. पूर्वीच्या आरक्षणाप्रमाणे प्रभाग 2, 8, 13, 14 हे सन 2015 ला इतर मागासवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे त्यांना वगळण्यात आले. ते सर्वसाधारण राखीव झाले. इतर उरलेल्या जागांमध्ये चिठ्ठी काढण्यात आली.

प्रभाग 11 हा इतर मागासवर्गासाठी राखीव झाला. प्रभाग 16 इतर मागासवर्ग स्त्रीसाठी राखीव झाला. प्रभाग 2, 5, 6, 14, 17 पैकी एक जागा महिलांसाठी राखीव काढण्यात येणार होती. ती चिठ्ठी प्रभाग 6 ची निघाली. त्यामुळे प्रभाग 1, 6, 7, 8, 13 हे सर्वसाधारण महिला राखीव झाले. 2, 5, 14, 17 हे प्रभाग सर्वसाधारण झाले.

त्यामुळे आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. चारित्र्य संपन्न, कार्यक्षम, निर्व्यसनी आणि उमद्या उमेदवारांना यंदा जनता पसंती देताना दिसत आहे. पॅनल बनवताना आता तयारी सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार दुसर्‍या प्रभागात लक्ष देत आहेत, त्यांना त्यांच्या प्रभागात रोखण्यांसाठी आतापासून तयारी सुरू झालेली आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या भूमिका गुलदस्त्यात आहेत. सामान्य जनता यंदाच्या निवडणुकीत डोळ्यात तेल घालून काय घडत आहे हे पाहत आहे.

यंदाची निवडणूक सामान्य जनतेने हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे. दरवेळेपेक्षा यंदा दिंडोरी शहरातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे. जे मागील काळात दिंडोरीकरांनी अनुभवले, राजकीय नेत्यांनी अनुभवले त्याचा अनुभव हृदयात ठेवून भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करून नेते पावले उचलत आहेत. सध्याचे पुढील नगराध्यक्षाचे आरक्षण अनुसूचित जमाती (आदिवासी) राखीव निघण्याची शक्यता असल्याची चर्चा दिंडोरी शहरात सुरू आहे. त्यामुळे अनेक नेते त्यादिशेने आतापासून प्रयत्न करत आहेत.

अनेकांना अध्यक्षपद ताब्यात ठेवण्यात रस दिसत आहे. त्यामुळे सकाळी एकाबरोबर राहायचे आणि दुपारी विरोधात प्रचार करायचा असा घातपाताचा पॅटर्न आता अनेकांनी सुरू केल्याने कोण कोणाबरोबर याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पण जनतेला समस्यांनी ग्रासल्याने जनता यावेळी गाव पुढार्‍यांचे न ऐकता निर्व्यसनी उमेदवारांनाच पाठिंबा देत आहे.

पैशाला काही लोक भुलतील, पण भ्रष्टाचारातून कमवलेले पैसे कोणी वाटल्यास त्याचा फारसा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर आता होणार नाही. कारण प्रत्येक मतदाराला ज्या अडचणी सहन कराव्या लागल्या, त्यामुळे प्रत्येक मतदाराने त्याच्या मनात उमेदवाराची प्रतिमा तयार करून ठेवली आहे. त्यात रात्री-अपरात्री कोण धावून येईल आणि प्रभागात कोण जास्त निधी आणून विकास करू शकेल याचा अभ्यास मतदारांनी केलेला आहे. त्यामुळे नेतेही जनतेच्या मागणीप्रमाणेच उमेदवार देण्यामागे आहेत.

काही ठिकाणी चांगले उमेदवार पाडण्यासाठी अनेक उमेदवार उभे करण्याची पॉलिसी काही नेत्यांनी आखलेली दिसत आहे. परंतु यंदाची निवडणूक युवक वर्गाने व जनतेने हातात घेतल्याने निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक राहणार आहे. मागील मतदार यादीवरून प्राप्त झालेली हरकत पाहता निवडणूक शाखा आणि नगरपंचायतीचे बीएलओ यांच्या कारभारावर संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रांत डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, मुख्याधिकारी नागेश येवले यांच्यावर मतदार यादीत होणारा गोंधळ आणि हरकती यांच्यावरून मागील वेळेस प्रशासनाची झालेली मलिन प्रतिमा सुधरवण्याचे आव्हान उभे राहणार आहे.

कळवण नगरपंचायत Kalwan Nagar Panchayat ही वेगाने विकसित होणारी नगरपंचायत असून यंदा या नगरपंचायतीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, आ. नितीन पवार आणि माजी आमदार जे. पी. गावित यांच्या समर्थकांत जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. सध्यातरी सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर नगरपंचायत निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे.

गेल्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार उभे केल्याने चर्चेचा विषय बनला होता. त्याची पुनरावृत्ती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला जबर फटका बसणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे गणित जुळते की नाही याबाबत साशंकता आहे. परंतु पक्षाच्या आदेशानुसार काही नेते काम करतील तर काही स्थानिक राजकीय गणितानुसार भूमिका घेतील, अशी चिन्हे आहे.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी पुन्हा चाचपणी सुरू केली आहे. मात्र एक एका वॉर्डात दोन किंवा तीन उमेदवार इच्छुक असल्याने प्रत्येक पक्षापुढे मोठा पेच उभा राहणार आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांची थोड्याफार प्रमाणात नाराजी पसरली आहे.

सध्या नगरपंचायती निवडणुकीची आरक्षण सोडत पार पडली आहे व मतदार यादीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यामुळे मतदार यादीत हरकती जास्त होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. नगरपंचायत क्षेत्रातील राजकीय इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत आघाडी होणार की स्वबळावर लढणार याबाबत इच्छुकांमध्ये साशंकतेचे वातावरण पाहायला मिळते.

भाजप स्वबळावर लढणार हे जवळजवळ निश्चित आहे. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महविकास आघाडी गणित नगरपंचायतीत जुळते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. या मुद्यांवर सध्या तरी कोणतीच चर्चा नाही. कळवण शहरामध्ये सर्वच पक्षांची ताकद वाढली आहे. काँग्रेस पक्ष ऐनवेळी उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे, मात्र असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. यावेळी तरुण तसेच नवख्या संभाव्य उमेदवारांची संख्या खूप मोठी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रस्थापितांना फार मोठी ताकद लावावी लागणार आहे. पण नवोदितांना मतदार संधी देतील, असा कल दिसत आहे.

गेल्या निवडणुकीत कळवण नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने 17 उमेदवार उभे केले असले तरी आयत्या वेळी त्यांना काँग्रेसचे तीन उमेदवार आयात करावे लागले, तर भाजपने 13 जागा तर सेनेने चार जागा लढवल्या. त्यात एका जागेवर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी होणार या आशेत काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेवटपर्यंत ताटकळत ठेवत ऐनवेळी काँग्रेसच्या नेत्या सुमित्रा बहिरम व शहराध्यक्ष प्रकाश पगार यांनी उमेदवार उभे केले माकपचे आमदार असताना एक उमेदवार उभा केला नव्हता. आगामी निवडणुकीत माकप उमेदवार देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सत्ता असलेल्या राष्ट्रवादी पक्षाकडून वॉर्डातील रस्ते, गटारी, पाणी अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत. कळवण शहराचा विकास झाला आहे. गेल्या निवडणुकीत राष्टवादी काँग्रेस 7, भाजपचे 4, काँग्रेस 3, शिवसेनेचा 1, अपक्ष 2 असे नगरसेवक विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे मंत्री भारती पवार व आमदार नितीन पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर भाजप, महाविकास आघाडी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com