करोनाचे भान ठेवून सण, उत्सव साजरे करावेत : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

प्रतिबंधीत क्षेत्रात सार्वजनिक उत्सवास बंदी कायम
आढावा बैठक
आढावा बैठक

मालेगाव | Malegaon

मालेगाव पॅटर्नचे नाव देशपातळीवर गेले असून त्यास आपण खरच पात्र आहोत, परंतु अद्यापही या संसर्गाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोरोनाचे भान ठेऊनच सण साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज केले.

गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरातील बालाजी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. गणेश उत्सव हा आनंदाचा व उत्सवाचा सण आहे. करोना महामारीचे संकट आजही कायम असून शासनाने सण उत्सव साजरे करण्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन करावे. यासाठी प्रशासनाकडून लागणारी सर्व मदत केली जाणार असून महानगरपालिकेमार्फत प्रत्येक प्रभाग निहाय गणपती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सार्वजनिक मंडळांनी शासन आदेशानुसार मंडपाची साईज व मुर्तीची उंची याची अंमलबजावणी करावी. गणपती विसर्जनासाठी मिरवणूकीला प्रतिबंध घालण्यात आला असून त्याचे काटेकोर पालन होणे अपेक्षीत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात कुठल्याही सार्वजनिक उत्सवास बंदी कायम असून प्रत्येकांनी घरात राहून सण उत्सव साजरे करावेत.

ज्या मालेगाव पॅटर्नचे देशपातळीवर नाव गेले आहे, त्याच प्रमाणे सर्व धर्माचे लोक सामाजिक सलोखा राखून चांगल्याप्रकारे उत्सव साजरे करतात व कोरोनाचा फैलाव होणार नाही यांची काळजी घेतात असे वातावरण आपल्याला यापुढेही कायम ठेवायचे आहे. या सर्व गोष्टींचे पालन करून आपण चांगल्या प्रकारे सण उत्सव साजरे करू अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी यावेळी व्यक्त केली.

करोना कालावधीत गर्दी होणार नाही, यासाठी महानगरपालिका प्रशासनासह पोलीस प्रशासन संयुक्तपणे काम करणार आहे. नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी प्रशासनामार्फत खबरदारी घेण्यात येणार आहे. करोनाचे संकट अजून टळलेले नाही, प्रत्येक नागरिकांनी घरात राहून घरातच सण उत्सव साजरे करावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.

जातीय सलोखा टिकविण्याची प्रत्येकाची जबाबदारी असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. शासन आदेशानुसार मिरवणूकीवर पुर्णपणे बंदी असून सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंग यांनी यावेळी केले.

यावेळी गणेश मंडळाच्या वतीने मनोगत व्यक्त करतांना प्रमोद शुक्ला, दिपक सावळे यांनी शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आश्वासन दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com