सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सव रद्द

ऑनलाईन दर्शनाची सुविधा
सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सव रद्द

दिंडोरी । प्रतिनिधी

राज्यात वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे उपाययोजना करण्यासाठी शासनाने ‘ ब्रेक द चेन’ अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद केल्याने साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सव यात्रेस सलग दुसर्‍या वर्षी भाविकांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे यात्रेवर अवलंबून असलेल्या व्यापार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

चैत्रोत्सव दि. 21 ते 27 एप्रिलदरम्यान होत आहे. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव रद्द झाला आहे. गेल्या वर्षीही राज्यात करोनाचा शिरकाव झाल्याने प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून प्रशासनाने 11 मार्चपासून मंदिरे दर्शनासाठी बंद केल्याने तेव्हाही चैत्रोत्सव रद्द केला होता. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनंतर 16 नोव्हेंबर 2020 ला अटी-शर्ती व कोविड नियमांचे पालन करून मंदिर भाविकांना खुले केले होते. यात 17 ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव व कावड यात्रादेखील रद्द करण्यात आली. दरवर्षी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व इतर राज्यांतून सुमारे दहा लाखांवर भाविक हजेरी लावतात.

ऑनलाईन दर्शनाची सुविधा

आदिमायेचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी आदिमायेची नित्य दैनंदिन पूजाविधी सुरू असून आदिमायेचे घरबसल्या दर्शन व्हावे यासाठी लाईव्ह ऑनलाईन दर्शन सुविधा ट्रस्टच्या वेबसाईट व सोशल मीडियाच्या माध्यमातून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने अगोदरपासूनच उपलब्ध करून दिली आहे. तसेच व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकद्वारे आदिमायेच्या मूर्तीचा दररोजचा फोटा नियमित प्रसारित करण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com