बोलठाणला खत विक्रेत्यांची चौकशी

बोलठाणला खत विक्रेत्यांची चौकशी

बोलठाण । वार्ताहर

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे रासायनिक खत चढ्या दराने विक्री होत असल्याची तक्रार व सोशल मीडियावर फिरणारे मेसेज यांची दखल घेत भरारी पथकाने पाहणी करून दुकानांची तपासणी केली. कोणत्याही खत विक्रेत्यांने जुना खतांचा साठा चढ्या दराने विक्री करू नये, तसे आढळून आल्यास सदर दुकानदांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पथकातील अधिकार्‍यांतर्फे देण्यात आला आहे.

रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. आधीच करोनामुळे बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्याने शेतमाल कवडीमोल किंमतीत विकावा लागत असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

अशातच खतांच्या दरवाढीचा दुहेरी फटका बसणार असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. त्यात बोलठाण येथे जुन्या खतांचा साठा असून तोही चढ्या भावाने विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषि विभागास प्राप्त झाल्याने तात्काळ भरारी पथकाने पाहणी करून दुकानदारांना जुना साठा हा जुन्या किंमतीत विक्री करण्याचे आदेश दिले आहे. सर्व दुकानदारांनी आपल्याकडील रोजचा साठा किती व किंमत किती हे ठळक प्रथम दर्शनी फलक लावण्याचे आदेश यावेळी पथकातर्फे देण्यात आले.

शेतकर्‍यांना युरिया मिळत नसल्याचे यावेळी कृषी अधिकारी यांना सांगितले व मिळाला तरी चढ्या किंमतीत मिळतो किंवा त्याबरोबर दुसरे खत घेण्याची मागणी होते याबाबत योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी केली.

भरारी पथकात नांदगाव तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, पं.स. कृषी विभागचे चौधरी, मंडळ कृषी अधिकारी, कृषीसहाय्यक होते. वाढलेल्या भावात वरिष्ठांच्या बैठक व चर्चा सुरू असून यात झालेली भाव वाढ कमी होण्याचीही शक्यता आहे. लवकरच योग्य तो निर्णय होईल असे कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले.

मागील वर्षी आपल्या तालुक्यातील खतांची मागणी 14 हजार मेट्रीक टन होती. यावर्षी आपण ती 20 हजार मेट्रीक टन केली असून खतांची टंचाई राहणार नाही. कोणीही घाईगर्दी करू नये छापलेल्या किंमतीत खत खरेदी करावे. काही समस्या असल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन देखील कृषि अधिकारी पाटील यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com