खतांची दरवाढ कमी होणार

केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आश्वासन : खा. डॉ. भामरे
खतांची दरवाढ कमी होणार

मालेगाव । प्रतिनिधी

रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतींबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. शेतकर्‍यांना ही दरवाढ परवडणारी नसल्याने खतांच्या किमती पूर्वीप्रमाणेच असाव्यात यासाठी त्वरित मंत्रिगटाची नियुक्ती करून किंमत कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती निश्चित कमी होतील, असा विश्वास खा. डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.

रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांसह विविध पक्षांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी पाठपुरावा करण्याचा आग्रह शेतकर्‍यांसह भाजप कार्यकर्त्यांनी खा. डॉ. भामरे यांच्याकडे सुरू केला होता. रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकरी हवालदिल झाले असल्याने खा. डॉ. भामरे यांनी तातडीने नवी दिल्ली येथे धाव घेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केमिकल अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स राज्यमंत्री मनसुक मांडवीया आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेत निवेदन सादर केले.

रासायनिक खतांच्या किमती अचानक दुप्पट वाढल्याने शेतकरीवर्गात तसेच भाजपच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीची जाणीव यावेळी तिघा मंत्र्यांना डॉ. भामरे यांनी करून दिली. सातत्याने दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या विवंचनेत आहेत. अशातच करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यात आल्याने त्याचा फटकादेखील शेतकर्‍यांना बसल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

यावेळी कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी खा. भामरे यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा खतांच्या दरवाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शेतकरी बांधवांना ही दरवाढ परवडणारी नसल्याने खतांच्या किमती पूर्वीप्रमाणेच असाव्या यासाठी त्वरित एका मंत्रिगटाची नियुक्ती करून खतांच्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे निश्चितच येत्या दोन ते तीन दिवसांत खतांच्या वाढलेल्या किमती कमी केल्या जातील आणि शेतकर्‍यांना वाजवी किमतीत रासायनिक खते मिळतील. खरीप हंगामाच्या आधी हा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

त्यामुळे देशभरातील आणि महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी काळजी करू नये. येत्या दोन-तीन दिवसांत खतांच्या किमती कमी होतील, असा विश्वास खा. डॉ. भामरे यांनी व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com