क्रीडा मार्गदर्शकांचा सन्मान

क्रीडा मार्गदर्शकांचा सन्मान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्री यशवंत व्यायामशाळा आणि टेबल टेनिस प्रशिक्षक आणि संघटक शशांक वझे यांच्या वतीने दिव्यांगांसाठी झटणारे क्रीडा मार्गदर्शक, संघटक प्रकाश फडके आणि सुगंधा शुक्ल यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, रिव्हर साईड गोल्फ कोर्सचे संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार, या कार्यक्रमाचे आयोजक टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे, छत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे, अविनाश खैरनार, नितीन हिंगमिरे, रवींद्र मेतकर, विजय पाटील, उदय खरे यांच्या हस्ते प्रकाश फडके आणि सुगंधा शुक्ल या दोन मान्यवरांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रकाश फडके हे स्वत: मूकबधीर असून मूकबधीर व्यक्तींच्या उन्नतीसाठी त्यांनी 32 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये मूकबधीर असोसिएशनची स्थापना केली. तसेच त्यांनी महाराष्ट्र मूकबधीर असोसिएशनवर अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी नाशिकमध्ये अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करून मूकबधीर खेळाडूंना चांगले व्यासपीठ तयार करून दिले. मूकबधीर रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. त्याचप्रमाणे सुगंधा शुक्ल यांनी अंध मुला-मुलींसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

या मुलांना विविध खेळांचे शिक्षण दिले. विशेष म्हणजे त्यांनी अंध मुले, मुलींना रोप, मल्लखांब तसेच पूर्णतः अंध आणि अंशतः अंध मुलांना 50 मीटर, 100 मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी आदी प्रकार शिकवण्याचे अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी प्रशिक्षित केलेल्या मुलांनी अनेक पारितोषिके मिळवली आहेत. या सत्काराला उत्तर देताना प्रकाश फडके यांनी त्यांच्या सांकेतिक भाषेत ऋण व्यक्त केले. त्याचा अनुवाद यांची मुलगी अनुपमा यांनी केला. तर सुगंधा शुक्ल यांनी आपल्या आतापर्यंतच्या कार्याची माहिती दिली आणि या सत्कारबद्दल आयोजकांचे आभार मानले.

आपल्याला मिळालेला हा पुरस्कार अंध विद्यार्थ्यांना आणि नॅब संस्थेला समर्पित केला. या कार्यक्रमास मूकबधीर असोसिएशनचे पदाधिकारी खेळाडू, यशवंत व्यायामशाळेचे प्रशिक्षक क्रीडा संघटक राजू शिंदे, यशवंत जाधव, योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, राजेश क्षत्रिय तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले. सत्कारार्थींचा परिचय शशांक वझे यांनी करून दिला तर आभार उदय खरे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com