घरचा सत्कार अधिक ऊर्जा देणारा: नारायण वाजे

घरचा सत्कार अधिक ऊर्जा देणारा: नारायण वाजे

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुक्याबाहेर अनेक सत्कार झाले. मात्र, आपल्या गावाने, संस्थेने केलेला सत्कार तेवढाच आनंददायी व ऊर्जा देणारा असल्याचे प्रतिपादन जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे नूतन अध्यक्ष नारायण वाजे (Narayan Waje) यांनी केले.

सिन्नर (sinnar) सार्वजनिक वाचनालयात वाजे यांच्यासह ’स्टाईस’चे (STICE) नवनिर्वाचित चेअरमन नामकर्ण आवारे, व्हा. चेअरमन सुनील कुंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्व. उत्तमराव ढिकले (Uttamrao Dhikle) व स्व. तुकाराम दिघोळे यांच्यामुळे आपण जिल्हा फेडरेशनशी जोडले गेलो. तालुका फेडरेशनने तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा फेडरेशनवर पाठवल्यानंतर आपल्याला तिथे खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळे श्रीमंत पतसंस्थेची प्रगतीकडील वाटचाल सोपी झाली.

आज जिल्ह्यातील पहिल्या तीन पतसंस्थांमध्ये ‘श्रीमंत’चा समावेश असून संस्थेच्या ठेवी 140 कोटींच्या पुढे गेल्या आहेत. तर 96 कोटींचे कर्ज वाटप (Loan Allocation) संस्थेने केले आहे. 40 कोटीहून अधिकची गुंतवणूक (investment) संस्थेने केली असून कर्जवाटप करताना कर्ज वसुलीवरही (Debt recovery) तेवढेच बारीक लक्ष असल्याने संस्थेची प्रगतीकडे घोडदौड सुरु आहे. स्व. भास्कर कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा फेडरेशनमध्ये खूप काम करायला मिळाले. राज्य पतसंस्था फेडरेशनशी संपर्क येत राहिला. त्यातून देशभर सहकारात चालू असलेले वेगवेगळे प्रयोग बघता आले.

अगदी परदेशात जाऊन तेथील सहकार चळवळीचा जवळून अभ्यास करता आला. त्याचा फायदा फेडरेशनचे काम करताना झाला. जिल्ह्यातल्या पतसंस्थांच्या अडीअडचणी दूर करण्याचे काम यापूर्वी स्व. कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली कधी उपाध्यक्ष म्हणून तर कधी कार्याध्यक्ष म्हणून करतच होतो. कोठावदे यांच्या अकाली निधनामुळे सर्वच पदाधिकार्‍यांनी आपल्यावर विश्वास दाखवून अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

सर्वांचा हा विश्वास सार्थ ठरवण्याचेच काम आगामी काळात होईल असा शब्द त्यांनी दिला. जिल्ह्यातील सहकार चळवळीपुढील अडचणी दूर करण्याबरोबरच पोषक वातावरण तयार करण्याचे काम फेडरेशनच्या माध्यमातून होईल असा विश्वासही त्यांनी दिला. आवारे प्रकृतीच्या कारणामुळे सत्कारास येऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी आवारे यांचे सहकारी, माजी चेअरमन अरुण चव्हाणके यांनी सत्कार स्विकारला.

कुंदे व वाजे यांचा उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, कार्यवाह हेमंत वाजे, माजी उपाध्यक्ष पी. एल. देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष नरेंद्र वैद्य यांनी आभार मानले. यावेळी जितेंद्र जगताप, मनीष गुजराथी, निर्मल खिवंसरा, चंद्रशेखर कोरडे, विलास पाटील, सागर गुजर, सुनील उगले या संचालकांसह अंबादास भालेराव व वाचक उपस्थित होते.

भूमिपुत्रांना प्राधान्य देणार

उद्योजकांनी सलग दुसर्‍यांदा माजी आमदार राजाभाऊ वाजे व नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला असून संस्थेवर निर्विवाद सत्ता दिली आहे. तालुक्यातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे उद्योग उभारावेत अशी राजाभाऊ व आवारे यांची इच्छा आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांना स्वतःचे उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन करणे व त्यांना प्लॉट्स उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यासाठी आगामी काळात 200 ते 250 एकर जमीन खरेदी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. वाचनालयाने आठवण ठेवून सत्कार केल्याबद्दल सर्व पदाधिकार्‍यांचे त्यांनी आभार मानले.

स्व. गडाख यांचा पुतळा व्हावा

स्थापनेपासूनची काही वर्ष आपणही ‘स्टाईस’शी जोडलो होतो. स्व. किसनराव चव्हाणके यांचेही वसाहतीतील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचे पुत्र अरुण चव्हाणके हे संचालक मंडळात पुन्हा निवडून आल्याचा आनंद वाटत असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत म्हणाले. स्व. सूर्यभान गडाख यांनी मुसळगावच्या माळरानावर सहकारी औद्योगिक वसाहत उभी करुन तालुक्याला दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढत रोजगाराचा नवा मार्ग उपलब्ध करून दिला. संस्थेच्या जडणघडणीतील त्यांच्या योगदानाचा विचार करता स्व. गडाख यांचा पुतळा ‘स्टाइस’ने उभारावा अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. या इच्छेचा नूतन संचालक मंडळाने सकारात्मक विचार करावा असे आवाहनही भगत यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com