नाशिक । विजय गिते

यावर्षी अतिवृष्टी ,परिणामी कांदा रोपवाटिकांचे झालेले नुकसान. त्यामुळे लांबलेला हंगाम,लेट खरीप कांद्याचे लागवडीला झालेला उशीर आणि आता काढणी होऊन विक्री विना पडलेला कांदा. तापमानात वाढ होऊन घसरलेली प्रतवारी व घटत चाललेले वजन त्यातच दहा दिवस बाजार समित्या बंद.अन त्यातच आता लॉकडाऊनचे भूत.अशा चक्रव्यूहात जिल्ह्यातील सुमारे 15 लाख टन कांदा विक्री अभावी तसाच पडून आहे.

सध्या कांद्याला नऊशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी भावाप्रमाणे जिल्ह्यात सुमारे दीडशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.त्यामुळे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करायचा असेल तर कांद्याला तीस रुपये प्रति किलो भाव देऊन खरेदी करा,अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे कांदा लागवड उशिरा झाली.त्यातच मजुरांची टंचाईची भर पडली. परिणामी जिल्ह्यात कांदा हंगाम लांबला आहे.त्यातच आता कोविड-१९ मुळे लॉकडाऊनची भीती कायम असून या लॉकडाऊनची टांगती तलवार लक्षात घेता कांद्याला 30 रुपये प्रति किलो भाव देऊन आमचा कांदा खरेदी करावा. मग भले लॉकडाऊन करावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

या बरोबरच द्राक्ष उत्पादकांनाही या लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. निर्यातक्षम द्राक्ष देशाबाहेर जाण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. या अडचणीवरही शेतकऱ्यांनी मध्यंतरी मात केली. मात्र, आता लॉकडाउनच्या भीतीमुळे द्राक्ष काढणीलाही त्याचा फटका बसत आहे.मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असून द्राक्ष काढून ठेवलेल्या द्राक्षाची लॉकडाऊनच्या भीतीपोटी विक्री होईल का ? अशी साशंकता द्राक्ष उत्पाकांमध्ये आहे.

जिल्ह्यात 17 बाजार समित्या आहेत.यापैकी पंधरा बाजार समित्यांवर कांद्याची आवक होते. यामध्ये लासलगाव,पिंपळगाव बसवंत, उमराणे, येवला, मनमाड, नामपूर, देवळा या ठिकाणी लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असते.मात्र,सध्या बँका 31 मार्च अखेर असल्यामुळे बंद होत्या.परिणामी रोखीने पैसे देण्यातही शेतकऱ्यांना अडचणी येतात.असे कारण देऊन बाजार समित्या व खरेदी बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही वर्षांपूर्वी चार ते पाच दिवस कामकाज बंद ठेवून ताळेबंद केला जात होता.मात्र,आता कामकाज पूर्णतः संगणीकृत झालेले असून देखील इतके दिवस बंद का ?असा सवाल आता कांदा उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, बाजार समित्या बंद राहिल्यामुळे जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणात तसाच पडून आहे.यामुळे सुमारे दीडशे कोटींची उलाढाल ठप्प झाली.याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने याबाबत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना पत्र काढले असून खरेदी सुरू करावी, अशा सूचना दिलेल्या आहेत.

कांदा दर घसरणीची भीती

कांदा उत्पाकांनी रांगडा (लेट खरीप) कांदा काढून ठेवलेला आहे,तर काही काढत आहेत. मात्र, तापमान अडतीस अंशांच्या पुढे जात असल्यामुळे कांद्याची गुणवत्ता घसरत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.यातच आर्थिक वर्ष संपल्याने बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात न घेता कामकाज बंद ठेवले आहे. परिणामी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा विक्री अभावी पडून आहे. आता एक दोन दिवसानंतर बंद असलेल्या बाजार समित्या सुरू झाल्यास आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याचे परिणामी दर घसरणीवर होतील. बंद काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याला आता जबाबदार कोण ?असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.